जळगाव : प्रतिनिधी
प.पू. नाना महाराज तराणेकर भक्तांमध्ये चैत्र वद्य दशमी ही तिथी मार्तंड दशमी किंवा चैतन्य दशमी म्हणून सर्वांच्या हृदयात अंकीत आहे. सदगुरुंचा ब्रह्मलिन होण्याचा दिवस पण आजही चैतन्याची अनुभूती असल्यामुळे दोन वर्षांच्या आपत्ती कालानंतर हा उत्सव नुकतेच इंदौर येथे झाला.
दोन वर्षापूर्वी निर्माण झालेल्या परिस्थितीत आपण कोरोनाच्या काळात आपापल्या ठिकाणी “मार्तंड महिमा पारायण”, “घोरातकष्टता स्तोत्राचा जप”, “दिगंबरा दिगंबरा” मंत्राचा जप इत्यादी संकल्पपूर्वक समग्र परिवाराने केले. याची सांगता पुणे येथे करण्याचे निश्चित झाले होते पण परिस्थितीने पुन्हा उचल खाल्ली त्यामुळे ऑनलाईन कार्यक्रम घेण्यात आला.
सन 2021 ते 2022 हे नानांच्या जन्मादिनोत्सवाचे 125वे वर्ष भक्तगण जरी एकत्र येवू शकलो नाही तरीही ऑनलाईन कार्यक्रम, प्रबोधन, सामूहिक त्रिपदी व अन्य कार्यक्रम सुरु राहिले. त्यात खंड पडला नाही. श्रावणातील या उत्सवाचे 126 वे वर्ष मात्र भव्य प्रमाणात करण्याचा संकल्प करण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे श्री. तराणेकर परिवाराचे उपस्थितीत तारखेप्रमाणे प.पू. नानांचा पुण्यउत्सव सामुहिकरित्या चैतन्यपीठावर (नागपूर) अखिल भारतीय त्रिपदी परिवाराच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरा झाला. महाप्रसाद व सामूहिक त्रिपदी असा कार्यक्रम झाला. इंदौर येथील या उत्सवाला पहाटेपासून काकड आरती, श्रींची पूजा, चारही वेदांचे मंत्र, सामूहिक प्रार्थना, व्यक्तिगत उपासना, भजनांचा कार्यक्रम आदी धार्मिक कार्यक्रम झाले.
प्रबोधन करतांना प.पू. बाबासाहेब तराणेकर यांनी, अनेक ठिकाणी याच पध्दतीने पुण्यतिथी उत्सव साजरा होत आहे. अगदी बाहेरच्या देशातही, याची माहिती व नव्याने सुरु झालेल्या विविध प्रकल्पांची माहिती तसेच त्रिपदी परिवाराचा होत असलेला विस्तार याची माहिती दिली.
पुण्यतिथीच्या दिवशी नेहमी प्रमाणे पहाटे पाच वाजेपर्यंत भजन, गवळण, भारुड आदी कार्यक्रमात भक्तांचा उत्साह दिसून आला. पाद्यपूजा व अनुग्रहाचा लाभ देखील काहींनी घेतला. महाप्रसादाचा उपलब्ध साहित्याचा लाभ देखील अनेकांनी घेतला. पुन्हा पुन्हा असा योग यावा अशी प.पू. सदगुरुंना प्रार्थना करुन भक्तगणांनी निरोप घेतला.