प्रभाग क्र. २ च्या आरोग्याकडे नपाचे होतेय दुर्लक्ष

0
14

अमळनेर : प्रतिनिधी
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र स्वच्छतेचा आग्रह केला जात आहे. नागरिकांनी स्वतःची व परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन शासन व प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. पण परिसराचे सार्वजनिक आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या विभागाने मात्र आपल्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र अमळनेर शहरातील सिंधी कॉलनीत दिसून येत आहे.
परिसरात वेळोवेळी साफसफाई व स्वच्छता करावी अशी मागणी जनतेतून होत आहे. आमच्या भागात सार्वजनिक ठिकाणी साफसफाई व स्वच्छतेची सुविधा कधी मिळणार असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत.
सिंधी कॉलनी हा संपूर्ण व्यापारी वर्गाचा परिसर आहे. रहिवासी नेहमीच आपल्या व्यवसायात व्यस्त असतात. व्यवसायासाठी या वस्तीपासून लांब गावात रोज ये -जा करावे लागते. या भागात कचर्‍याचे ढीग अनेक दिवसांपासून पडलेले आहेत. तर कॉलनीतील गटारी देखील हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र दिसत आहे. या परिसरातील नागरिकांनी प्रभागाचे नगरसेवक व संबंधित विभागाच्या कर्मचार्‍यांना वारंवार सांगूनही काहीही फरक पडत नाही अशी नागरिकांची तक्रार आहे. आता तर कोरोनाच्या
दुसर्‍या लाटेमुळे सर्वत्र आरोग्य विभाग अतिशय सतर्क असतांना सिंधी कॉलनी वासियांना या उलट अनुभव येत आहे. अमळनेर न.पा. चा आरोग्य विभाग नागरिकांनी अनेकदा तक्रारी करून देखील स्वच्छतेच्या बाबत सदर परिसरात कानाडोळा करीत असल्याचे दिसत आहे. येथील नगरसेवक ५ वर्षाच्या कार्यकाळात नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कितीदा आले याबाबतची चर्चा नागरिकांत आहे.
खरे तर या परिसरात स्वच्छता नसल्याने अनेक आजारांना आपोआप आमंत्रण मिळत आहे. संबंधित विभागाने या भागातील साफसफाई व स्वच्छतेची आवश्यकता लक्षात घेऊन वेळीच स्वछता करावी. अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here