अमरावती : वृत्तसंस्था
सूर्यमालेतील सर्वांत दूरचा व पृथ्वीपेक्षा चौपट मोठा असलेल्या नेपच्यून ग्रहाची प्रतियुती १९ सप्टेंबर रोजी होत आहे. प्रतियुतीवेळी पृथ्वीच्या एका बाजूस ग्रह व विरुद्ध बाजूस सूर्य असतो. प्रतियुतीच्या दिवशी ग्रह पूर्वेस सूर्यास्तास उगवतो व रात्रभर आकाशाची फेरी मारून सूर्योदयी पश्चिमेस मावळतो. तसेच यावेळी तो पृथ्वीजवळ आल्याने मोठा व तेजस्वी दिसतो. या निळसर रंगाच्या ग्रहाला पाहण्यासाठी दुर्बिणीची गरज लागणार आहे.
जेव्हा ग्रह आणि सूर्य पृथ्वीच्या विरुद्ध दिशेला आणि पृथ्वीजवळ असतो, तेव्हा त्याला प्रतियुती असे म्हणतात. या ग्रहाचे निरीक्षण केले असता फिकट निळ्या रंगाचा हा ग्रह दिसतो. आज १९ सप्टेंबरला हा ग्रह पूर्व क्षितीजावर उगावेल व पश्चिमेकडे मावळेल. रात्रभर आकाशात हा ग्रह दिसेल. मात्र साध्या डोळ्यांनी हा ग्रह पाहता येणार नाही तर यासाठी शक्तिशाली दुर्बिनची आवश्यकता असल्याचे मराठी विज्ञान परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी सांगितले.
पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यास या ग्रहाला १६५ वर्षे लागतात व स्वत:भोवती एक फेरी तो १६ तासांत पूर्ण करतो. या ग्रहाचा शोध १३ सप्टेंबर १८४६ मध्ये जर्मन वैज्ञानिक गॅले आणि लव्हेरिया यांनी लावला. या ग्रहाला १३ चंद्र आहेत. या ग्रहाच्या वातावरणात मिथेन असल्याने हा ग्रह निळा दिसतो. या ग्रहाचा व्यास ४८६०० किमी आहे व भुपृष्ठाचे तापमान उणे २१४ अंश सेल्सिअस आहे.
२४ ऑगस्ट १९८९ रोजी व्हायेजर-२ हे मानवरहित यान नेपच्यून जवळून गेले होते. पृथ्वीपासून या ग्रहाचे अंतर ४.३ अब्ज किलोमीटर आहे. या खगोलीय घटनेचा मानवी जीवनावर कोणताही वाईट परिणाम होणार नसल्याची माहिती खगोल अभ्यासकांनी दिली.