पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक ८ मधील विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपुजन !

0
24
जळगाव (प्रतिनिधी ) : नगरसेवक मनोज चौधरी यांच्या पाठपुराव्याने आणि पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने मंजूर करण्यात आलेल्या शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील सुमारे ८५ लाख रूपयांच्या  विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपुजन आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी जळगावच्या विविध भागांमध्ये वेगाने विकासकामे सुरू झाली असून येत्या काळात नागरिकांना सर्व सुविधा मिळणार असल्याचे नमूद करत नगरसेवक मनोज चौधरी यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आज शहरातील प्रभाग क्रमांक आठमध्ये विकासकामांचे भूमिपुजन आणि लोकार्पण करण्यात आले. प्रारंभी बाळासाहेब ठाकरे आणि सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमांचे माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक ८ मधिल गट क्रमांक १०१ च्या  शिवशक्ती नगरातील कॉलनी रस्त्याच्या डांबरीकरणास प्रारंभ ( रु.४० लाख ); साईनगर मधील आरसीसी गटराचा शुभारंभ (१९ लक्ष ); गट क्रमांक ८७ मधील आनंद कॉलनीतील रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाचे लोकार्पण (२३ लक्ष) आणि इतर पेव्हींग ब्लॉक बसविणे अशा एकूण ८५ लाखांच्या कामांचे भूमिपुजन आणि लोकार्पण ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर जयश्रीताई महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, माजी महापौर नितीन लढ्ढा, जिल्हा नियोजन समिती सदस्य शाम कोगटा, नगरसेवक मनोज चौधरी, डॉ. चंदशेखर पाटील, प्रतिभा पाटील आणि लताताई भोईट यांच्यासह ज्येष्ठ नागरिक प्रकाश पाटील, सुधीर पाटील, टी.पी. चौधरी, भारतीताई पाटील, रेखाताई चौधरी, श्रीमती जाधव ताई, आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आणि कॉलनीवासियांतर्फे पालकमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी उपस्थितांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी शहरात सध्या विकासकामांना वेग सुरू आला असून यात प्रामुख्याने रस्त्यांसह महत्वाच्या कामांना प्राधान्य देण्यात आले असल्याचे नमूद केले. जळगावकरांना सर्व सुविधा देण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे नमूद करत नगरसेवक मनोज चौधरी यांच्या सामाजिक कामांचे आणि धडाडीचे त्यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन नगरसेवक मनोज चौधरी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here