पूर्वार्ध
जळगाव : हेमंत काळुंखे
राज्य नाट्यस्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात जळगाव व भुसावळच्या नाटकांनी आपला ठसा उमटवला असून या स्पर्धेच्या निमित्ताने सांस्कृतीकदृष्ट्या मागासलेल्या जळगावला व नाट्यरसिकांना सलग विविधांगी नाटकांची अपूर्व मेजवानी मिळत आहे. नाट्यस्पर्धेचा पडदा लवकरच पडणार असून आता रसिकांना उत्कंठा लागली आहे ती या स्पर्धेत
कोण बाजी मारणार? कोण-कोणती नाटके चमकणार? हौशी कलावंतापैकी कोणाला पारितोषिक मिळणार याबाबतची.यंदाचे वैशिष्ट म्हणजे या स्पर्धेत जळगाव शहरासह जिल्ह्यातील 11 संस्थांनी सहभाग नोंदविला असून भुसावळच्या तीन तर मध्यप्रदेशातील एका संस्थेनेही हजेरी लावली
आहे.
कोणतीही स्पर्धा म्हटली की, त्यात चुरस निर्माण झाालीच पाहिजे.ती यंदाही दिसून आली. स्पर्धेत जय-पराजय वाट्याला येतोच मात्र स्पर्धेत भाग घेणेे ही सर्वप्रथम कौतुकास्पद बाब होय.नाटक सादरीकरणातून आपल्या अंगी असलेल्या कौशल्यपणाला व नेपुण्याला संधी देणे हे देखील तितकेच महत्वाचे ठरते. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच नाट्य संस्थांना किंवा हौशी कलावंतांना बक्षिसे मिळतील असे कदापीही होऊ शकत नाही.तसे होणे शक्य नसले तरी त्यांनी या स्पर्धेत हिरीरीने भाग घेवून नाट्य चळवळीला प्रोत्साहन देण्याचा जो प्रयत्न केला त्याबद्दल स्पर्धेतील सर्व सहभागी संस्थांचे व कलावंतांचे सर्वप्रथम कौतुक आणि अभिनंदन.
राज्य मराठी हौशी नाट्य स्पर्धेची सुरुवात गेल्या 21 फेब्रुवारी रोजी भुसावळ येथील औष्णिक विद्युत केंद्र,दीपनगरच्या ‘कूस बदलताना’ या नाटकाने झाली.यंदा स्पर्धेत एकूण 15 नाटकं सादर होत असून येत्या 8 मार्च रोजी या नाट्यमहोत्सवाची सांगता होत आहे. या स्पर्धेचे समीक्षकांच्या नजरेतून या सदरासाठी मी दोन टप्पे केले असून पहिल्या टप्प्यात सादर झालेल्या सात नाटकांचा समावेश केला आहे.त्यात 21 रोजीचे कुस बदलतांना, 22 फेब्रुवारी रोजी ब्राम्हण संघ भुसावळ यांचे ‘एक चौकोन विस्कटलेला’, 23 रोजी केअर टेकर फाउंडेशन जळगावचे ‘माणूस नावाचे बेट’, 24 रोजी जननायक थिएटर ग्रुप आदर्शनगरचे ‘स्टे’, 25 रोजी अप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठानचे ‘दिशा’तर 26 फेब्रुवारी रोजी बेंडाळे महिला महाविद्यालयाचे ‘फायटर’, 27 रोजी मनोधैर्य फाउंडेशनचे ‘हेरंबा’ या नाटकांचा समावेश आहे.
एकंदरीत या स्पर्धेेतील नाट्य कलाकृतींच्या पहिल्या सात सादरीकरणांवर एक नजर टाकली असता, या स्पर्धेत पुर्वार्धाच्या शर्यतीत असलेल्या नाटकांमध्ये प्रामुख्याने एक चौकोन विस्कटलेला,माणूस नावाचे बेट,दिशा,फायटर,हेरंबा या नाटकांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.त्यात माझ्या नजरेतून दिशा,फायटर व एक चौकोन विस्कटलेला व माणूस नावाचे बेट ही नाटके पुर्वार्धाच्या शर्यतीत अग्रभागी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. रसिकांची मने काबीज करण्यात ही नाटके यशस्वी ठरली असली तरी त्यातही ‘दिशा’ व ‘फायटर’ या दोन नाटकांचा आवर्जुन नामोल्लेख करावा लागेल.
या नाटकांमधील पुरुष पात्रांमध्ये एक चौकोन विस्कटलेला मधील चिन्मय केळकर (अमित सहस्त्रबुध्दे ) तसेच रुपाली अग्रवाल(श्रीमती सहस्त्रबुध्दे) यांच्या भूमिका नोंद घेण्यासारख्या वाटल्या.त्यात चिन्मय केळकरने तर राजकारणातील युवकाची भूमिका साकारतांना प्रेक्षकांची मने जिंकून टाळ्या मिळविल्या.त्यास त्याच्या अभिनयाची पावती मिळाल्य़ास नवल वाटू नये.याशिवाय ‘दिशा’ या नाटकाने तृतीयपंथीयांच्या समस्यांकडे लक्ष वेधले.त्यातील शरद भालेराव यांनी वठविलेली ‘दिशा’ लाजबाब वाटली. पुरुष असतांनाही शरद भालेरावांनी साकारलेली ‘दिशा’ रसिकांची दाद मिळवून गेली.तृतीयपंथीयाच्या विशेष भूमिकेबद्दल भालेराव यांच्या अपेक्षा उंचावल्या तर नवल वाटू नये. ‘माणूस नावाचे बेट’ या नाटकातील ‘मालू’ची भूमिका वठविणारी स्वप्ना लिंबेकर-भट ही स्त्री पात्रात आपल्या सहज अभिनयाने लक्षात राहिली. तिचे पुरस्कार किंवा प्रमाणपत्राचे स्वप्न पूर्ण झाल्यास चुकीचे ठरु नये. याच नाटकातील दीपक भटचा काशिनाथ उपाध्येदेखील दखल घेण्यासारखा.प्रदीप भोई दिग्दर्शित ‘हेरंबा’ नाटकाला फारशा अपेक्षा नसल्यातरी या नाटकातील महेंद्र खेडकरचा ‘गुरु’ प्रभावी ठरला.त्याच्या अपेक्षाही उंचावू शकतात.
या स्पर्धेच्या निकालाची उत्सुकता नाट्य संस्थांसह हौशी कलावंतांमध्ये लागली असून शासनातर्फे नियुक्त परिक्षक श्री. ईश्वर जगताप(नाशिक), मिनाक्षी केढे(पुणे), किशोर दऊ(नागपूर) यांनी स्पर्धेतील नाटकांचे बारकाईने अवलोकन केले असून त्यांनी दिलेला निकाल हा अखेर सर्वांना शिरोधार्थ असेल.त्यांचा तो हक्क आहे यात वाद नाही.या नाट्य स्पर्धेतील रस्सीखेचमध्ये कोणत्या नाटकांना गौरविले जाते व कोणत्या हौशी कलावंतांना पारितोषिके किंवा प्रमाणपत्र मिळतात हे लवकरच घोषित होणार असले तरी या स्पर्धेत पहिल्या टप्प्यात ‘दिशा’ की ‘फायटर’ यशस्वी ठरते की, एक विस्कटलेला चौकोन, ‘माणूस नावाचे बेट’ रसिकांबरोबरच परिक्षकांवरही छाप पाडते,हे निकालानंतर स्पष्ट होईल.निकाल काहीही लागला तरी जळगाव केंद्रावर या नाट्य स्पर्धेत सहभाग घेऊन नाट्यचळवळीला बळ देणाऱ्या सर्व संस्थांचे व हौशी कलावंतांचे पुन्हा एकदा कौतुक.
या स्पर्धेत ज्या संस्थांनी व कलावंतांनी सहभाग घेवून जी रंगत आणली व निम्म्यावर नाटकांनी जी चुरस निर्माण केली ती निश्चितच कौतुकास्पद म्हणावी लागेल.यानिमित्ताने नाट्यरसिकांना विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या नाटकांचा अनुभव घेता आला व कोरोना काळात थंडावलेल्या नाट्य चळवळीला निश्चितच प्रोत्साहन मिळाले हे मान्य करावे लागेल व त्याचे श्रेय महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांसह जळगाव केंद्रावरील स्पर्धेचे समन्वयक दीपक पाटील व त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांना स्पर्धा यशस्वी करण्यासाठी द्यावे लागेल.