लखनौः वृत्तसंस्था
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी बरोबर आठ वाजता सुरुवात झालीय. करहल मतदार संघातून समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव आघाडीवर असल्याचे वृत्त आहे. त्यातच त्यांनी एक ट्वीट करून निकालाआधीच फटाके उडवले आहेत. आपल्या अतिशय मोजक्या आणि मार्मिक शब्दांमध्ये त्यांनी भाजपसह विरोधकांचा समाचार घेतलाय. ते म्हणतायत की, इम्तिहान बाकी है हौसलों का…पुढे ही त्यांनी अतिशय मार्मिक टिप्पणी केलीय. खरे तर प्रत्येकाचे पाच राज्यांपैकी सर्वाधिक लक्ष उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालावर लागले आहे. उत्तर प्रदेशातील मतदारांचा कौल कोणत्या राजकीय पक्षाला मिळणार यावर देशाच्या आगामी राजकारणाची दिशा ठरणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपने योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढवली. भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील प्रचारात उपस्थिती लावली. दुसरीकडे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या नेतृत्त्वात समाजवादी पक्ष आणि आरएलडीने निवडणूक लढवली आहे.
अखिलेश काय म्हणाले ?
अखिलेश यादव यांनी आज सकाळी 8 वाजून 41 मिनिटांनी ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी एक शेर ट्वीट केलाय. त्यात ते म्हणतायत की, इम्तिहान बाकी है अभी हौसलों का, वक़्त आ गया है अब ‘फ़ैसलों’ का. यानंतर त्यांनी आपले कार्यकर्ते, समर्थक, नेते, पदाधिकारी, शुभेच्छुक यांना मनापासून धन्यवाद दिलेत. या साऱ्यांनी समाजवादी पक्ष आणि आघाडीचे खूप चांगले काम केले. मतदान केंद्रावर रात्रंदिवस दक्ष राहिले, याबद्दल त्यांनी आभारही मानले आहेत. शिवाय लोकशाहीच्या सैनिकाचे विजयाचे प्रमाणपत्रही घेऊनच यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
उत्तर प्रदेशात इतिहास घडवत योगीच्या नेतृत्त्वात भाजप पुन्हा सत्तेत येणार की समाजवादी पक्षाला लॅाटरी लागणार? याचा फैसला आज होणार आहे. सकाळी आठ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला पोस्टल बॅलेट आणि त्यानंतर ईव्हीएममधील मतमोजणीला सुरू झालीय. 10.30 नंतर उत्तर प्रदेशातील 403 जागांवरील कौल यायला सुरुवात होईल आणि एक वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल, अशी शक्यता आहे.