दोन विचारांमधील व्दंद ‘ब्लडी पेजेस’ ः मु.जे.ने समर्थपणे सांभाळले चॅलेंज

0
7

राज्य मराठी नाट्य हौशी स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील अंतीम नाटकात जळगावच्या मु.जे.महाविद्यालय(स्वायत्त)ने ‘ब्लडी पेजेस’हे जुन्या व नविन विचार संघर्षावरील नाटक प्रभावीपणे सादर करुन स्पर्धेतील चुरस आणखी वाढविली आहे. लेखक श्रीपाद देशपांडे यांच्या मूळ संहितेला दिग्दर्शक वैभव मावळे यांनी आपल्या टीमच्या माध्यमातून जे ‘वैभव’प्राप्त करुन दिले ते कौतुकास्पद व अभिनंदनीय.
आपले कुळ पुरुष, त्यांचे कर्तृत्व, त्यांनी मिळवलेल्या गतवैभवाचा मिजास हीच आपली खरी संपत्ती व जीवनशैली मानून कृतिशून्य आयुष्य जगणारा ‘बटू’ व जुनाट परंपरेत गुदमरलेला आणि नविन ते स्विकारण्यासाठी धडपडणारा ‘मोरु’ या दोन व्यक्तिरेखांमधील वैचारिक व्दंद म्हणजेच ‘ब्लडी पेजेस’ ही कथा.
प्रारंभापासून उठावदार
पडदा उघडल्यापासून ते पडदा पडेपर्यंत प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यात लेखक,दिग्दर्शक, कलाकारांसह भक्कम तांत्रिक बाजू यशस्वी ठरली.पेशवाईची झूल पांघरलेला बटू त्याचं बिऱ्हाड घेऊन शनिवारवाड्याच्या आश्रयाला साजू या वेडसर मुलीला आणि भाऊ मोरेश्वरला घेऊन येतो. बटूला पेशव्यांच्या दरबारी गाजवलेला इतिहास आणि त्यांच्या आठवणींवर जगतांना वास्तवाचे भान राहत नाही. घरातील वस्तू विकून गुजराण त्याला करावी लागते. मोरेश्वरला मात्र वास्तवाचे भान असते आणि त्याची मिळेल ते काम करण्याची तयारी असते.नोकरी, व्यवसाय करणे म्हणजे कुळाला बट्टा लावणे असा बटूचा समज असतो.या दोघांच्या वैचारिक संघर्ष पेशवाईच्या माध्यमातून सादर करण्याचा झक्कास प्रयत्न हा वाखणण्याजोगा ठरला आहे.

या प्रवाहात साजू झालेल्या शुभांगी वाडिलेचा रंगमंचावरील सहज वावर व बिनधास्त भूमिका लाजबाब. त्याबद्दल तिचे करावे तेवढे कौतुक थोडेच.साजूचे रंगमंचावरील खेळणे, बटूला घोडा करणे आणि नको त्या शब्दांचा अर्थ तिला समजतांना मोरेश्वरची उडणारी भंबेरी सिद्धांत सोनवणेने तितक्याच कल्पकतेने व खुबीने सादर केली आहे.काही प्रसंगात तो भाव मारुन गेला.
बटूच्या भूमिकेत दीपक महाजनने जीव ओतला आहे मात्र पहिल्या अंकातील त्यांनी संवादफेकीत केलेली घिसडघाई खटकली मात्र दुसऱ्या अंकात त्यांनी ती लगेच दुरुस्त केल्याचेही जाणवले.सिद्धांत सोनवणेने मोरु संयत अभिनयाने सहज निभावला. भाऊस्वामीच्या भूमिकेत संदीप तायडे समरस झाला मात्र ओरडणे म्हणजे अभिनय नाही हे ध्यानात घ्यायला हवे. मल्हारबा(सुभाष गोपाळ)ः, शिंदे(लोकेश मोरे)आणि विश्वासराव(अभिषेक कासार) यांच्या भूमिका ठिकठाक.
तांत्रिक बाजूही भक्कम
दिनेश माळी यांचे नेपथ्य व उमेश चव्हाण यांची प्रकाश योजना ही ब्लडी पेजेस च्या आणखी जमेच्या बाजू ठरल्या.नेपथ्य विषयाला साजेसे व अनुरुप तर प्रकाश योजनेने रंगत आणली.तेजसा सावळे यांचे पार्श्‍वसंगीत उत्तम पण काही ठिकाणी कर्कशपणा टाळू शकले असते. वेशभूषा शुभांगी वाडिले व प्रज्ञा बिऱ्हाडे यांनी रंगभूषा तितक्याच समर्थपणे सांभाळली.सौरभ दाबीर,प्रथम तायडे,निखील मानकरे व स्वप्निल लहासे यांचे रंगमंच सहाय्यही लाभले.केसीई सोसायटीचे चेअरमन नंदकुमार बेंडाळे यांचे अचूक मार्गदर्शन व निर्मिती प्रमुख शशिकांत वडोदकर व प्राचार्य स.ना.भारंबे यांच्यासह योगेश शुक्ला,जगदीश नेवे,रवि परदेशी,अजय शिंदे,कपिल शिंगाणे,देवेंद्र गुरव यांचे लाभलेल्या विशेष सहकार्याचाही या यशात खारुताईचा का होईना,वाटा आहे हेदेखील नमूद करावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here