जळगाव : प्रतिनिधी
दीपस्तंभ मनोबल हे देशातील दिव्यांग, अनाथ आणि वंचितांचे विदयापीठ आहे, आणि हे विदयापीठ दिव्यांग विदयार्थ्यांच्या स्वप्नपूर्ती साठी महत्वाची भूमिका बजावत आहे.आपल्या आयुष्यात अडचणी आल्या की आपण अस्वस्थ होतो.पण या दिव्यांग आणि अनाथांच्या आयुष्यात इतक्या अडचणी असूनही त्यांच्यातील उत्साह आणि चेहऱ्यावरील आनंद हा नक्कीच प्रेरणादायी आहे.दिव्यांगांच्या आणि अनाथांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करून त्यांना जगण्याची ऊर्जा आणि बळ निर्माण करणाऱ्या या प्रकल्पाला भेट देणं हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा आणि समाधानाचा दिवस आहे असे प्रतिपादन विभागीय आयुक्त नाशिक राधाकृष्ण गमे यांनी केले.
दीपस्तंभ फाऊंडेशनच्या मनोबल प्रकल्पास राधाकृष्ण गमे, प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ आणि जळगावचे तहसीलदार नामदेव पाटील यांनी भेट दिली. यावेळी दिव्यांग विद्यार्थींनी माउली अडकूर हिने मान्यवरांचे औक्षण केले.या वेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी मोकळा सवांद साधला आणि मागर्दर्शन केले. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर आपले ध्येय निश्चित करून ध्येयाच्या दिशेने सातत्याने मार्गक्रमण करत राहणे गरजेचे आहे.क्षेत्र कुठलेही असो आपण करत असलेले प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर यश नक्कीच मिळते.तेव्हा मनोबलच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेल्या संधीच सोन करा.तुम्हाला भेटून आणि मनोबलच्या या कार्याने मी भारावून गेलो आहे.भविष्यात माझी जेव्हा ही गरज लागेल तेव्हा मी नक्कीच आपल्यासोबात असेल अश्या भावना राधाकृष्ण गमे यांनी व्यक्त केल्या. या प्रसंगी दीपस्तंभचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन, संचालक राजेंद्र पाटील, रेक्टर डॉ.रामचंद्र पाटील आणि मनोबलचे सर्व विदयार्थी उपस्थित होते.