‘त्या’ प्रकरणात खानकडे ड्रग्ज सापडलेच नव्हते

0
8

मुंबई : प्रतिनिधी
काही महिन्यांपूर्वी कॉर्डिलिया ड्रग्ज पार्टी प्रकरणात प्रचंड गाजावाजा करत अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यनला अटक करण्यात आली होती. मात्र, आता या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने आर्यन खान याच्याकडे त्यावेळी ड्रग्ज सापडलेच नव्हते, असा अहवाल दिला आहे. एनसीबीतील सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे अमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या भूमिकेवर नव्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आर्यन खान याच्याकडे ड्रग्ज सापडलेच नाहीत तर मग त्याचा फोन ताब्यात घेऊन चॅटस का तपासण्यात आले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच कॉर्डिलिया क्रुझवर धाड घातली तेव्हा एनसीबीच्या नियमांप्रमाणे त्याचे व्हीडिओ चित्रीकरण करण्यात आले नव्हते, असेही एसआयटीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. गुन्ह्यात अटक केलेल्या अनेक आरोपींकडून जप्त केलेले ड्रग्ज सिंगल रिकव्हरी म्हणून दाखवले आहेत, असेही एसआयटीने म्हटले आहे.
आर्यन खान याला अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि एनसीबीवर अनेक गंभीर आरोप केले होते. आर्यन खानला याप्रकरणात जाणीवपूर्वक गोवल्याचा आरोप करण्यात आला होता. बऱ्याच गदारोळानंतर एनसीबीने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमली होती. तसेच समीर वानखेडे यांची एनसीबीच्या विभागीय संचालकपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. मात्र, आता एसआयटीच्या अहवालामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा नव्याने तापण्याची शक्यता आहे.
आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर बराच गदारोळ झाला होता. याप्रकरणात एनसीबीने आर्यन खान याचा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, उच्च न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला होता. आर्यन खानच्या मोबाईलमधील व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स पाहिल्यास त्यात काहीही आक्षेपार्ह दिसत नाही आणि आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाझ मर्चंट व मुनमुन धमेचा या तिघांनी कोणतेही कट कारस्थान रचल्याचे त्यातून स्पष्ट होत नाही. याविषयीच्या एनसीबीच्या आरोपात तथ्य दिसत नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here