विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील जाळपोळ आणि हिंसाचार आपण पाहिलाय. त्यानंतर पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये जाळपोळ सुरू झाली आहे. ही जाळपोळ तृणमूलच्या एका नेत्याच्या हत्येनंतर सुरू झाली आहे. बोगतुई या गावातील जाळपोळीच्या घटनेत जवळपास डझनभर घरं आणि 10 लोकांना जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये जवळपास 38 लोक जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. या जाळपोळीच्या घटनेनंतर पुन्हा एकदा पश्चिम बंगालमधील वातावरण तापलं आहे. स्थानिक पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार रामपुरहाट शहराबाहेरील बोगतुई गावामधील घरांमधून आतापर्यंत सात मृतदेह सापडले असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे घटनास्थळावर 10 जळलेले मृतदेह सापडल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. पोलिसांनी सांगितलंय की, गावातील तृणमूल काँग्रेसचे नेते भादु शेख यांचा मृतदेह सोमवारी आढळून आला. या प्रकरणाची सखोल चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. जाळपोळीच्या घटना पश्चिम बंगालमध्ये होत असल्याने पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
एसआयटी गठीत
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जाळपोळीच्या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सूचनेनुसार मंत्री फिरहाद हकीम यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय शिष्टमंडळ रामपुरहाट हत्याकांडाची संपूर्ण माहिती घेण्यासाठी घटनास्थळी गेले आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहता मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनेवरून सीआयडीचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी तीन सदस्यीय एसआयटी पथक स्थापन करण्यात आलं आहे. रामपुरहाटमध्ये तृणमूल नेत्याच्या हत्येनंतर जमावाने कथित घरांना आग लावल्याने अनेक लोकांचा मृत्यू त्यामध्ये झाला आहे, असं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी पश्चिम बंगालच्या स्थानिक माध्यमांना सांगितलं आहे.
विधानसभेत गदारोळ
बिरभुमच्या रामपुरहाट पोलीस स्टेशन हद्दीतील बोगतुई गावात घटनेनंतर बंगाल विधानसभेत विरोधकांनी गदारोळ केला आहे. भाजपने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत या प्रकरणावर जाब विचारला. विधासभेत प्रचंड गदारोळ झाला असून या घटनेवरुन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यात निर्माण झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर यावेळी विधानसभेत ममता बॅनर्जी यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न निरोधाकांनी केलाय. या घटनेचे पडसाद पश्चिम बंगालमध्ये उमटण्याची शक्यता देखील व्यक्त केली जातेय.