ज्वारीची कणसं, केळीचा घड, कापूस देऊन महोत्सवात मान्यवरांचे स्वागत

0
3

जळगाव : प्रतिनिधी

मुंबईत पु. ल. देशपांडे मिनी सभागृह, रवींद्र नाट्यमंदिर प्रभादेवी येथे जळगाव परिवर्तन आयोजित तीन दिवसीय कला महोत्सवाची सांगता रविवारी झाली. बहिणाबार्इंच्या कवितांचा व गाण्यांचा सांगीतिक ‘अरे संसार संसार’, कार्यक्रम, ‘नली’ एकलनाट्य व ‘अमृता साहिर इमरोज’ नाटक असे तीन कार्यक्रम पार पडले. तिन्ही कार्यक्रमांना उदंड प्रतिसाद मिळाला. महोत्सवात प्रमुख पाहुण्यांना ज्वारीच्या तोट्यासह असलेली कणसं, केळीचा घड, कापसाची टोपली भेट देण्यात आली. हे खान्देशी आदरातिथ्य इथल्या रसिकांना अधिक भावले.

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी महोत्सवाचे उद्घाटन केले.रामदास भटकळ, ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते, चित्रकार शुभा गोखले , अभिनेते नंदू माधव, राहुल निंबाळकर व मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन कापूस, केळी, धान्याचं कणीस देऊन करण्यात आले. वीणा जामकर, संदीप मेहता, श्रीनिवास नार्वेकर, अभिजित झुंजारराव, अक्षय शिंपी यांनी या महोत्सवाचे आयोजन केले.

उद्घाटनानंतर बहिणाबार्इंच्या कवितांचा व गाण्यांचा सांगीतिक ‘अरे संसार संसार’ कार्यक्रम परिवर्तनच्या कलावंतांनी सादर केला. विजय जैन यांची संकल्पना तर नारायण बाविस्कर यांनी दिग्दर्शित केलेल्या या कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकून घेतली. कविता वा गाणी आपण ऐकतो पण त्यामागचा गहन अर्थ लक्षात येत नाही. तो अर्थ,त्या मागचं जगण्याचं तत्त्वज्ञान उलगडून सांगत ती कविता आपल्या मनात पक्की बसवायचं काम या कार्यक्रमातून शंभू पाटील करतात. माहेरची कविता सादर करणाऱ्या सोनाली पाटील यांनी बहिणाबार्इंचं ‘माहेर’ आपल्या वाचनामधून जिवंत केलं. श्रद्धा पुराणिक कुळकर्णी यांच्या ‘आज माहेराले जाणं, अरे संसार संसार, माही माय सरसोती, सुगरणीचा खोपा, आखाजी अशी अनेक गाणी सादर केली. सुदीप्ता सरकार यांचा घनगंभीर स्वर, घरोटा हे गाणं त्या ज्या पद्धतीने सादर करतात ते अनुभवायला हवे असेच आहे. मंजुषा भिडे यांनी पारंपरिक ओव्या सादर केल्या. बहिणाईच्या कविता मंजुषा भिडे, सोनाली पाटील, प्रतीक्षा कल्पराज यांनी सादर केल्या. अक्षय गजभिये यांची हार्मोनियम व गायनाने सुंदर रंग भरले. प्रतीक्षा कल्पराज यांनी नेमाडे यांची वही सादर केली. बुधभूषण मोरे यांनी गोंधळ सादर केला. भूषण गुरव यांनी तबल्यावर साथसंगत दिली.

सांस्कृतिक चळवळीचा नवा आयाम
खान्देशात जिथे पूर्वी फार काही घडत नव्हतं तिथे आता परिवर्तन संस्था परिवर्तन घडवत आहे. परिवर्तनचे काम, निर्मिती हे सांस्कृतिक चळवळीला नवे आयाम देणारे आहे. खान्देशी भाषा, संस्कृतीचं प्रतिबिंब हे त्यांच्या कलाकृतीतून दिसून येते. मी त्यांची निर्मिती अनुभवलेली आहे, असे मत मुंबईत आयोजित केलेल्या परिवर्तन कला महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी केले.

‘नली’ एकलनाट्य रंगले
महोत्सवात हर्षल पाटील यांची भूमिका असलेल्या ’नली’ एकलनाट्याच्या प्रयोगालाही रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समारोप सत्रात रविवारी ‘अमृता साहिर इमरोज’ हे नाटक सादर झाले. त्यातील संवाद दर्दी रसिकांच्या काळजाला भिडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here