जळगाव : प्रतिनिधी
येथील जेसीआय संस्थेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पहिल्याच दिवशी ३४ महिलांनी शिबिराचा लाभ घेतला. शिबीर १८ मार्च पर्यंत सुरु आहे. जेसीआय जळगाव संस्थेतर्फे मंगळवार दि. ८ ते १८ मार्च दरम्यान भास्कर मार्केटसमोरील राम टोटल बॉडी चेकअप सेंटर येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येत आहे. मंगळवारी शिबिराचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी शल्यचिकित्सक डॉ. ए. सी. पाटील, शल्यचिकित्सक डॉ. ए. जी. भंगाळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीतील तांत्रिक पर्यवेक्षक लक्ष्मीकांत त्रिपाठी, डॉ. राहुल व्यास यांची उपस्थिती होती.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यानंतर जेसीआयचे अध्यक्ष भाग्येश त्रिपाठी यांनी प्रस्तावनेत शिबीर घेण्यामागील उद्देश स्पष्ट केला. डॉ. ए. सी. पाटील, डॉ. ए. जी. भंगाळे यांनी मनोगतातून निरामय आरोग्याविषयी माहिती दिली. यानंतर तपासणी शिबिराला प्रारंभ करण्यात आला. शिबिरात संधिवात, आमवात, मूळव्याध, मधुमेह, लठ्ठपणा, निद्रानाश, दमा, थायरॉईड, त्वचा विकार, उच्च रक्तदाब, मुतखडा, आदि आजारांविषयी मोफत तपासणी आणि मार्गदर्शन डॉ. राहुल व्यास यांनी केले. शिबिरात महिलांनी उपस्थिती देऊन त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती देत तपासणी करून घेतली. हे मोफत आरोग्य तपासणी शिबिर हे पुढील दहा दिवस महिलांसाठी सुरु असून सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहनजेसीआय जळगावच्या पदाधिकऱ्यांनी केले आहे. कार्यक्रमास जेसीआय जळगावचे अध्यक्ष भाग्येश त्रिपाठी, सचिव शुभम दायमा,सहायक सचिव भूषण कासार, नीर जैन, सुदर्शन त्रिपाठी, जनसंपर्क अधिकारी सूरज बिर्ला, आशुतोष दायमा यांचे सहकार्य लाभत आहे.