जळगाव ः प्रतिनिधी
राज्याच्या ‘कृषी धोरण 2020’ अंतर्गत जिल्ह्यातील पहिले वीज उपकेंद्र चिंचोली येथे उभारण्यात येत आहे. या उपकेंद्रामुळे शेतकरी आणि उद्योजकांना ऊर्जा मिळणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. चिंचोली येथील 33/11 केव्ही क्षमतेच्या वीज उपकेंद्राच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून उर्जामंत्री नितीन राऊन यांनीही सहभाग घेतला.
वीज उपकेंद्र भूमिपूजन कार्यक्रमाला परिमंडळाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे, अधिक्षक अभियंता फारूक शेख, कार्यकारी अभियंता रमेशकुमार पवार, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध नाईकवाडे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, उपजिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, उपजिल्हा संघटक नाना सोनवणे, बाजार समिती सभापती कैलास चौधरी, जनार्दन पाटील, काँग्रेसचे पदाधिकारी संजय वराडे, पंचायत समिती सदस्य नंदलाल पाटील, अनिल भोळे, पंकज पाटील, युवा सेनेचे शिवराज पाटील, प्रवीण पाटील, योगेश लाठी, प्रमोद सोनवणे, चिंचोलीचे सरपंच शरद घुगे, धानवडचे सरपंच संभाजी पवार, उमाळ्याचे राजू पाटील उपस्थित होते.
धानवड रस्त्याला चार कोटी
धानवड येथून सुप्रीम कंपनीला जोडणारा रस्ता दुरूस्त करण्याची मागणी करण्यात आली होती. हा रस्ता करमाडपर्यंत जातो. या कामासाठी चार कोटी रूपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. शेत पाणंद रस्त्यांना वाढीव निधीची तरतूद करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. सूत्रसंचालन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विश्वनाथ पाटील यांनी केले. जळगाव विभागाचे कार्यकारी अभियंता रमेशकुमार पवार यांनी आभार मानले.
वीज उपकेंद्रामुळे फायदे
कृषी धोरण 2020 अंतर्गत 3 कोटी 41 लाख रूपयांचा निधी दिला असून या उपकेंद्रामुळे कृषी व गावठाण वाहिनी वेगळी होईल. चिंचोली, देव्हारी, धानवड, उमाळा, कुसुंबा, कंडारी या गावांना 24 तास वीज, व्ही-सेक्टर या उपकेंद्रातून जळगाव एमआयडीसी उपकेंद्राचा भाग कमी होऊन एमआयडीसीला सुरळीत वीजपुरवठा करण्यात येईल .