गौतम बुद्धांनी मानवतेचा विचार मनामनात रुजवला

0
8

जळगाव ः प्रतिनिधी
कोणत्याही समाजव्यवस्थेत व्यक्ती हा केंद्रबिंदू ठेऊन त्याचा सर्वांगीण उद्धार हाच त्या व्यवस्थेचा अंतिम उद्देश असला पाहिजे. परंतु भारतासारख्या देशांमध्ये जाती, धर्म, लिंग यावर आधारित समाजव्यवस्था व्यक्ती-व्यक्तींमध्ये विषमता व भेदभाव निर्माण करते. परंतु, बुद्ध धम्म सांगतो तृष्णा हे दुःखाचे कारण आहे. भगवान गौतम बुद्धांनी मानवतेचा विचार मनामनात रुजवला, असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. मिलिंद बागुल यांनी येथे केले.

अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठान व शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदयात्री अण्णासाहेब डॉ. जी. डी. बेंडाळे पुण्यतिथी व बुद्धपौर्णिमा निमित ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते. बुद्धांनी आपल्या पहिल्याच उपदेशात मानवी समाजात असलेल्या विषमतेचे वर्णन केले आहे. मनुष्यप्राणी दुःखात, दैन्यात आणि दारिद्रयात राहत आहे. याचाच अर्थ दुःख आणि दारिद्रय ही व्यक्तीला आणि परिणामी समाजाला अधोगतीकडे नेणारे मार्ग आहेत.
मनोगतात प्राचार्य डॉ. अशोक राणे यांनी सांगितले की, अष्टांगिक मार्ग हा गौतम बुद्धांनी सांगितलेला काम, क्रोध, द्वेष आदी दोष दूर करून जीवन निर्मळ करण्याचा सदाचाराचा मार्ग आहे. त्यास मध्यम मार्ग सुद्धा म्हणतात. या वेळी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. केतन चौधरी, मू. जे महाविद्यालयाचे प्राचार्य संजय भारंबे, शालेय समन्वयक चंद्रकांत भंडारी, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्तविक व आभार प्रा. संदीप केदार यांनी मानले.
विचारांची देवाण-घेवाण करण्याचा प्रयत्न करावा
बुद्ध धम्म हा शांती व समतेचा संदेश देतो. जीवनात सकारात्मक विचार करायला शिकवतो. द्वेषभावनेला तिलांजली देऊन मैत्रीचं नातं घट्ट करण्याचा विचार त्यातून मिळतो. बुद्ध धम्माचे सिंद्धांत चिकित्सपणे अभ्यासून त्यानुसार वाटचाल केली तर जीवनाला नवी दिशा मिळण्यास नक्कीच मदत होईल, असा सल्लाही डॉ. बागुल यांनी व्याख्यानातून दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here