कांद्याच्या दरात पुन्हा वाढ, पावसामुळे पिकांचे नुकसान

0
5

पुणे, वृत्तसंस्था । परतीच्या पावसामुळे नवीन कांदा लागवडीवर परिणाम झाला असून महाराष्ट्रातील शेतक ऱ्यांनी साठविलेल्या जुन्या कांद्याला परराज्यातून मागणी वाढत आहे. या मागणीमुळे बाजारात कांद्याचे दर वाढत चालले असून किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार एक किलो कांद्याची विक्री ५० ते ६० रुपये किलो दराने केली जात आहे. नवीन कांद्याचे पीक हाती येण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे कांदा दरात यापुढील काळात वाढ होणार असल्याची माहिती कांदा व्यापाऱ्यांनी दिली.

महाराष्ट्रासह कर्नाटकात झालेल्या परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. आंध्र प्रदेश, तमिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये परतीचा पाऊस झाला. नवीन हळवी कांद्याचे पीक साधारणपणे नोव्हेंबर महिन्याच्या आसपास येते. परतीच्या पावसामुळे नवीन कांद्याच्या लागवडीवर परिणाम झाला असून यापुढील काळात अतिवृष्टी न झाल्यास कांदा पीक वाचेल. पुढील पंधरा दिवसांत नवीन कांदा लागवडीचे चित्र स्पष्ट होईल. दिवाळीपर्यंत कांद्याचे दर चढेच राहणार आहेत. महाराष्ट्रासह कर्नाटकात नवीन कांद्याची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते. सध्या बाजारात जुन्या कांद्याला मागणी वाढत असून मागणीच्या तुलनेत आवक अपुरी आहे. साठवणुकीतील कांद्याच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या जुना कांद्याला दर मिळाले आहेत, अशी माहिती पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी दिली.

किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार एक किलो कांद्याची विक्री ५० ते ६० रुपये दराने केली जात असल्याचे किरकोळ बाजारातील भाजीपाला विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत सरासरी १०० ते १३० गाडय़ांमधून कांद्याची आवक होत आहे. घाऊक बाजारात कांद्याला प्रतवारीनुसार ३० ते ४५ रुपये प्रतिकिलो असा दर मिळाला आहे. मुंबई, ठाणे तसेच उपनगरांत किरकोळ बाजारात एक किलो कांद्याची विक्री ५० ते ५५ रुपये दराने केली जात आहे. सध्या बाजारात नवीन कांदा उपलब्ध नाही. देशभरातून महाराष्ट्रातील जुन्या कांद्याला मागणी सर्वाधिक असते. नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नवीन कांद्याच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. इतर राज्यांतील कांदा पिकालाही परतीच्या पावसाने फटका बसला आहे. मागणी प्रचंड आणि तितक्या प्रमाणात कांदा उपलब्ध नसल्यामुळे कांदा पुढील काही दिवस महागच राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here