प्रतिनिधी | नाशिक
मुंबई इंडियन्स विरुद्ध हैदराबाद सनरायझर्स यांच्यातील क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेणाऱ्या बुकीला अटक करण्यात आली आहे. अासाराम बापू पुलाजवळ दीपमाला बिल्डिंगमधील फ्लॅट नंबर ५ मध्ये गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने ही कारवाई केली. गुरुविंदरसिंग बलदेवसिंग (२८, रा. हिरावाडी) असे या क्रिकेट बुकीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी रात्री पथकाचे रवींद्र बागूल यांना एक बुकी हा फ्लॅटमध्ये अायपीएलच्या क्रिकेट सामन्यावर बुकिंग घेत असल्याचे समजले. पथकाने संबंधित इमारतीवर छापा टाकला असता संशयित क्रिकेट सामन्यावर बेटिंग खेळणाऱ्या लोकांना मोबाइलवर सट्टाभावाबाबत माहिती पुरवत त्यांच्याकडून पैसे घेऊन बेटिंग घेत असल्याचे निदर्शनास अाले. पथकाने संशयिताच्या ताब्यातून बेटिंग अायडी असलेले पाच मोबाइल, लॅपटाॅप, बेटिंगचे नंबर लिहिलेले नोटबुक असा ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. संशयिताच्या विरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ, विष्णू उगले, नाझीम पठाण, प्रवीण वाघमारे, महेश साळुंके, आसिफ तांबोळी, विशाल देवरे, प्रतिभा पोखरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
क्रिकेट बेटिंगचे षटकार
गुन्हे शाखेच्या पथकाने उशिरा का होईना केलेल्या कारवाईने शहरात क्रिकेट बेटिंगचे उत्तुंग षटकार सुरू असल्याचे शिक्कामोर्तब झाले. क्रिकेट बेटिंग घेणारे शहरातील नामांकित बुकींना मात्र पकडण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचे निदर्शनास येत अाहे. नवीन पोलिस अायुक्त जयंत नाईकनवरे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले अाहे.