आजाराला कंटाळून वृध्दाने संपविले जीवन

0
25

जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील विदगाव येथील एका ७० वर्षीय वृध्दाने आपल्याला असलेल्या दुर्धर आजाराला कंटाळून आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील विदगाव येथे श्रीराम जीवराम कोळी (वय ७०) हे पत्नी व दोन मुलांसह रहिवासाला आहे. ते दोन्ही मुलांसह शेतीचे कामकाज करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना दुर्धर आजार जडला होता. अनेक ठिकाणी उपचार करुनही ते त्या आजारातून बरे होवू शकले नाहीत. वारंवार उपचार घ्यावा लागत असल्याने ते ह्या आजाराला कंटाळले होते. काल रात्री कुटुंबियांसोबत नेहमीप्रमाणे जेवण करुन ते त्यांच्या घराच्या मागील खोलीत एकटेच झोपले होते. आज सकाळी पत्नी लताबाई यांनी पती श्रीराम कोळी अजुनही का उठले नाही, म्हणून त्यांच्या खोलीचा दरवाजा ढकलला असता त्यांना श्रीराम कोळी हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. हे दृष्य पाहून कोळी कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला. श्रीराम कोळी यांना तात्काळ खाली उतरवत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषीत केले. याबाबत तालुका पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ संजय चौधरी हे करीत आहेत. मयत श्रीराम कोळी यांच्या पश्‍चात पत्नी लताबाई, दोन मुले समाधान व देविदास, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here