चोपडा ः प्रतिनिधी
दि.२३ मार्च सायंदैनिक साईमत मधे वर्डी येथील ज्वारी उत्पादक शेतकर्यांनी बियाणेबाबत केलेल्या तक्रारीसंबंधी ‘दै.साईमत’ वृत्तपत्रात वृत्त प्रकाशित होताच लागलीच या तक्रारीची दखल घेत कृषी अधिकार्यांनी थेट तक्रारदार शेतकर्यांच्या शेतात भेट देऊन ज्वारी पिकांची पाहणी केली.
कृषी अधिकार्यांनी तक्रारदार शेतकर्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली असता ज्वारीची कणसे पुर्ण भरलेले नाहीत त्यामुळे शेतकर्यांचे शंभर टक्के नुकसान झालेले आहे. प्रशासनाने बियाणे कंपनीला शेतकर्यांचे झालेले नुकसान भरपाईचे आदेश द्यावेत. अन्यथा, शेतकरी संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संदीप पाटील यांनी दिला.
याप्रसंगी कृषि अधिकारी आर.आर.चौधरी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी डी.एम.शिंपी, कृषी विज्ञान केंद्र पालचे कृषी शास्त्रज्ञ अतुल पाटील, हायटेक सिडस्चे विभागीय व्यवस्थापक चेतन गिरासे, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, विनोद धनगर, लहुश धनगर, किरण गुर्जर, सचिन सोनवणे, अविनाश शिंदे, कैलास पाटील, साहेबराव पाटील, ओंकार धनगर, संदीप धनगर, भूषण पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.
दरवेळेस बियाणे कंपनी शेतकर्यांना सदोष बियाणे पुरवठा करतात व कृषि विभाग नेहमीप्रमाणे पंचनामे करून मोकळा होतो. मात्र, ज्या शेतकर्यांचे सदोष बियाणांमुळे नुकसान होते ते कोर्टकचेरी व ग्राहक मंचामध्ये फेरफटका मारून जेरीस येतात. कृषि विभागाने शेतकर्यांना बोगस बियाणे पुरवठा करणार्या कंपन्यांवर वेळीच बंदी आणावी व शेतकर्यांची फसवणूक थांबवावी, अशी मागणी देखील संदीप पाटील यांनी केली आहे.
‘सायंदैनिक साईमत’मध्ये वृत्त प्रकाशित करून शेतकर्यांच्या समस्येला वाचा फोडल्याबद्दल शेतकर्यांतर्फे जिल्हा शेतकरी संघटनेतर्फे आभार मानण्यात आले.