साईमत मुंबई प्रतिनिधी
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाला पुन्हा एकदा गती मिळाली असून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगूल अधिकृतपणे वाजले आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा केली. या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, १६ ते २१ जानेवारीदरम्यान उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्जांची छाननी २२ जानेवारी रोजी होणार असून, २७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी माघारी घेण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजेनंतर अंतिम उमेदवार यादी व निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.
५ फेब्रुवारीला मतदान, ७ फेब्रुवारीला मतमोजणी
या निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी करण्यात येणार असून, त्याच दिवशी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
१२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांसाठी निवडणूक
निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षणाच्या अटीत या निवडणुका घेतल्या जात आहेत. या टप्प्यात राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे.
कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग; पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर; तर संभाजीनगर विभागातील संभाजीनगर, परभणी, धाराशीव व लातूर जिल्ह्यांचा यात समावेश आहे.
प्रत्येक मतदाराला दोन मते
या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला दोन मते द्यावी लागणार आहेत—एक जिल्हा परिषदेसाठी आणि दुसरे पंचायत समितीसाठी. संपूर्ण नामनिर्देशन प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. राखीव जागांसाठी जातवैधता प्रमाणपत्राची पडताळणी आवश्यक असून, निवडून आल्यानंतर सहा महिन्यांत प्रमाणपत्र सादर न केल्यास सदस्यत्व रद्द होणार आहे.
ईव्हीएमद्वारे मतदान; विशेष सुविधा
या निवडणुकीसाठी राज्यभरात २५ हजार ४८२ मतदान केंद्रे उभारण्यात येणार असून मतदान ईव्हीएमद्वारे होणार आहे. यासाठी २२ हजार कंट्रोल युनिट आणि १ लाख १० हजार बॅलेट युनिट वापरली जाणार आहेत. सर्व मतदान केंद्रांवर वीज, पिण्याचे पाणी व शौचालयाची सुविधा असेल. काही ठिकाणी महिला मतदारांसाठी ‘पिंक’ मतदान केंद्रे, तर काही ठिकाणी आदर्श मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या घोषणेमुळे स्थानिक राजकारणात हालचालींना वेग आला असून, आगामी काळात राजकीय समीकरणे अधिक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
