चाकू–कोयत्यांनी मारहाण; रुग्णालयात तणाव, मोठी गर्दी
साईमत/ धानोरा, ता. चोपडा /प्रतिनिधी :
लोणी (ता. चोपडा) येथे गोवंश कत्तलीची माहिती मिळाल्यानंतर तपासासाठी गेलेल्या काही तरुणांवर स्थानिक कसाईंच्या गटाकडून प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री आठ वाजता घडली.
हल्ल्यात कृष्णा भिल (१८, रा. जामनेर) आणि योगेश महाराज कोळी (३५, रा. जळगाव) हे दोन तरुण गंभीर जखमी झाले असून संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कृष्णा भिल याला लोणी गावात कथित गोवंश कत्तल सुरू असल्याची माहिती मिळताच तो योगेश कोळी आणि आणखी काही तरुणांसह तेथे पोहोचला.
त्यांनी कत्तलीला विरोध करण्याचा प्रयत्न करताच काही स्थानिक कसाई कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करत चॉपर, कोयते आणि लोखंडी दांडके घेऊन त्यांच्यावर हल्ला चढविला. हल्ल्यात योगेश कोळी यांच्या मांडीवर चॉपरने गंभीर वार करण्यात आला, तर दोघांनाही बेदम मारहाण झाल्याने त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच सकल हिंदू समाजातील कार्यकर्ते तसेच नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली. पोलिसांनी तत्काळ लोणी गावासोबतच रुग्णालय परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. हल्ल्यानंतर तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
