साईमत, जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील वाघारी येथे भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (पीएमएफएमई) योजनेच्या माध्यमातून आईस्क्रिम कोन निर्मिती आणि कुल्फी निर्मितीचा उद्योग युवकाने उभारला आहे. प्रकल्पाच्या कारखान्याचे उद्घाटन जामनेरच्या माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. वाघारी येथील युवा उद्योजक दीपक निरंजन उंबरकर यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या माध्यमातून ४० लाख रुपयाचे कर्ज उपलब्ध करून आईस्क्रिम कोन निर्मितीचा प्रकल्प सुरू केला आहे. त्यात त्यांनी स्वतः ५० लाखांची गुंतवणूकही केली आहे.
उद्घाटनप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती छगन झाल्टे, कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी डॉ.अभिमन्यू चोपडे, मंडळ कृषी अधिकारी धनश्री चासकर, सरपंच माया खोनगारे, उपसरपंच संदीप सरताळे, ग्रामसेवक भास्कर महाजन, कृषी पर्यवेक्षक एस.एस.चिमणकारे, कृषी सहाय्यक ईश्वर कोळी, वाडी किल्लाचे विलास पाटील यांच्यासह वाघारी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचालन मोहनसिंग खोनगारे तर आभार सलीम शेख यांनी मानले.
योजनेचा युवकांनी लाभ घेण्याचे आवाहन
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (पीएमएफएमई) योजनेचा लाभ जिल्ह्यातील युवकांसह नागरिक, महिला, पुरुष बचत गट, शेतकरी, कंपन्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा संसाधन व्यक्ती रवींद्र गुजर यांनी केले आहे.