शैक्षणिक साहित्यासह प्रशस्तीपत्र देऊन १२०० विद्यार्थ्यांचा सन्मान
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला. ना.सार्व. विद्यालयात किशोर महोत्सवाचा समारोप बक्षीस वितरण कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात झाला. सुरुवातीस प्रमुख पाहुणे म्हणून हास्यजत्रा फेम हास्य कलाकार प्रा. हेमंत पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यासमितीचे प्रमुख प्रा. शरदचंद्र छापेकर, शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे, ज्येष्ठ पर्यवेक्षक संजय वानखेडे, पर्यवेक्षिका रमा तारे, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख सुवर्णा वंजारी, उपप्रमुख स्मिता करे यांच्या हस्ते माता सरस्वती पूजन करण्यात आले. तसेच प्रमुख पाहुण्यांचा सत्कार प्रा. शरदचंद्र छापेकर यांच्या हस्ते भेटवस्तू, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ, शाल देऊन करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर किशोर महोत्सव अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा :चित्रकला, हस्ताक्षर, निबंध, प्रश्नमंजुषा, कथाकथन, वक्तृत्व, पॉवर पॉईंट स्लाइड शो, इंग्रजी व्याकरण मॉडेल, अवकाश, पृथ्वी, पर्यावरण, मॉडेल, तक्ता, हस्तकला, गणित, विज्ञान,पारंपरिक रांगोळी स्पर्धा, हस्तकला, हस्तलिखित, फलक लेखन, आनंद बाजार, विविध गुणदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम आदी स्पर्धांमधील १२०० बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचं व शाळेचे अभिनंदन करून सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहून चांगली प्रेरणादायी पुस्तक वाचण्याचे व शाळेचा नावलौकिक वाढविण्याचे आवाहन केले.यशस्वीतेसाठी विविध समिती प्रमुख, उपप्रमुख तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक तथा परिचय रेखा पाटील, सूत्रसंचालन मनिषा पवार तर बक्षीस वितरणाचे वाचन पंकज खंडाळे यांनी केले. आभार योगिता महाजन यांनी मानले.
