दुपारी झालेल्या हल्ल्याने शहरातील सुरक्षा व्यवस्थेला धक्का
साईमत /जळगाव / प्रतिनिधी
शहरातील डॉ. आंबेडकर मार्केट परिसरात दुचाकी लावण्याच्या वादातून रविवारी दुपारी २७ वर्षीय चंदन संचानंद भारती यांच्यावर धारदार शस्त्राने खुनी हल्ला करण्यात आला. या घटनेत चंदन गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या मित्रांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंदन भारती (रा. कुंवर नगर, सिंधी कॉलनी) ५ एप्रिल रोजी दुपारी सुमारे ४:१५ वाजता आंबेडकर मार्केटच्या मागील बाजूस गेले. तेथे दुचाकी लावण्याच्या कारणावरून चार अनोळखी तरुणांशी वाद झाला. वाद हळूहळू हाणामारीत रूपांतरित झाला आणि एका आरोपीने धारदार शस्त्राने चंदन यांच्या कमरेखाली दोन वार केले. तर दुसऱ्या आरोपीने त्यांच्या डोक्यावर फायटरने प्रहार केला.
भांडण सोडवण्यासाठी आलेले चंदनचे मित्र विशाल इंगळे आणि धीरज बाविस्कर यांनाही आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फिर्यादीच्या तक्रारीवरून चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक उल्हास च-हाटे करत आहेत.
भरदिवसा घडलेल्या या हल्ल्यामुळे शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे पोलिसांनी आवाहन केले आहे.
