मुलांच्या खेळण्याच्या वादातून हिंसाचार
साईमत/नशिराबाद/प्रतिनिधी –
नशिराबाद गावातील मणियार मोहल्ला परिसरात मुलांच्या खेळण्याच्या किरकोळ कारणावरून उफाळलेल्या वादाचे रूपांतर थेट हिंसक हाणामारीत होऊन एका ३७ वर्षीय तरुणावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना २५ जानेवारी रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी बुधवारी (दि. २८) सकाळी ११.३० वाजता जखमी तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिसांनी संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेख खलील अहमद सलीम मणियार (वय ३७, रा. मणियार मोहल्ला, नशिराबाद) हे रविवारी सायंकाळी सुमारे ७ वाजेच्या सुमारास सार्वजनिक ठिकाणी उपस्थित असताना मुलांच्या खेळण्यावरून शेख ओसामा शेख रहेमतुल्ला व त्याचे दोन नातेवाईक यांच्यात वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक वाद असलेली ही घटना काही वेळातच चिघळून हाणामारीत परिवर्तित झाली.
वादाच्या दरम्यान संशयित आरोपींनी शेख खलील यांना अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर शेख ओसामा याने जवळील लोखंडी रॉडने शेख खलील यांच्या डोक्यावर जोरदार वार करत त्यांना गंभीर जखमी केले. याचवेळी आरोपीचे इतर नातेवाईक व वडील यांनीही शेख खलील यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच ‘जीवे ठार मारण्याची’ धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेख खलील यांनी उपचारानंतर २८ जानेवारी रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. त्यानुसार नशिराबाद पोलीस ठाण्यात संशयित आरोपी शेख ओसामा शेख रहेमतुल्ला व त्याचे दोन नातेवाईक यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस कर्मचारी प्रशांत विरणारे करीत असून, परिसरात या घटनेमुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी खबरदारीचे उपाय करण्यात येत आहेत.
