“रामू, मी गेल्यानंतर माझी स्टोरी इन्स्टावर टाक.”असे त्याने लिहिले आहे.
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
शहरातील एका खाजगी फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थ्याने नैराश्याच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (१५ फेब्रुवारी) संध्याकाळी उघडकीस आली. नेहरू नगर परिसरातील भाड्याच्या खोलीत ही घटना घडली. श्याम प्रभाकर पाटील (रा. बोदवड) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो देवकर कॉलेज ऑफ फार्मसी येथे द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. त्याच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमुळे महाविद्यालयाचे प्राचार्य वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड येथील शेतकरी कुटुंबातील श्याम जळगावात राहून उच्च शिक्षण घेत होता. रविवारी त्याचे रूममेट मित्र गावी गेल्याने तो खोलीवर एकटाच होता. संध्याकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास त्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. काही वेळाने ही बाब उघड झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
सुसाईड नोटमधील वेदनादायी आरोप
घटनास्थळी पोलिसांना श्यामच्या खिशात एक चिठ्ठी आढळली. त्यात त्याने आपल्या मृत्यूसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश पवार यांना जबाबदार धरले आहे. “माझी कोणतीही चूक नसताना प्राचार्यांनी सर्व शिक्षक आणि मित्रांसमोर माझा अपमान करून मारहाण केली. मित्रांच्या भांडणात मध्यस्थी करायला गेलो असताना समोरचा मुलगा इतरांना घेऊन आला, तरी त्याला काहीच म्हटले नाही. उलट मलाच पीव्हीसी पाईपने मारले आणि शिवीगाळ केली. गुरु मारतात हे माहीत आहे, पण इतके नाही मारत,” असे त्याने लिहिले आहे.
पत्राच्या शेवटी त्याने आपल्या मित्राला उद्देशून लिहिलेली ओळ मन हेलावून टाकणारी आहे — “रामू, मी गेल्यानंतर माझी स्टोरी इन्स्टावर टाक.” या वाक्यामुळे विद्यार्थ्याच्या मानसिक अवस्थेची कल्पना येत असून, सोशल मीडियावरही या घटनेची तीव्र चर्चा सुरू झाली आहे.
पालकांचा संताप, कारवाईची मागणी
घटनेची माहिती मिळताच श्यामचे नातेवाईक आणि मित्र मोठ्या संख्येने शासकीय रुग्णालयात दाखल झाले. “जोपर्यंत संबंधित प्राचार्य आणि दोषींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही,” अशी ठाम भूमिका श्यामच्या पालकांनी घेतली आहे. एका हुशार व अभ्यासू विद्यार्थ्याला छळामुळे जीव गमवावा लागल्याचा आरोप करत विद्यार्थी वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
पोलिसांचा तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुसाईड नोट जप्त केली. अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ अजित पाटील करीत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे शैक्षणिक संस्थांमधील शिस्तीच्या नावाखाली होणाऱ्या वर्तनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण, अपमानास्पद वागणूक आणि त्याचे परिणाम यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली असल्याची भावना व्यक्त होत आहे.
