एमआयडीसी पोलिसात तरुणाविरुध्द गुन्हा दाखल
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील एका हॉटेलमध्ये एरंडोल येथील तरूणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार २६ मे रोजी घडला आहे. तसेच तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची तिला धमकी दिली. अखेर याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जामनेर तालुक्यातील रहिवासी असलेली २३ वर्षीय तरूणी ही सध्या एरंडोल शहरात वास्तव्याला आहे. पीडित तरूणीची ओळख विश्वजीत विठ्ठलसिंग सिसोदे (वय २७, रा. बरेजवळा, ता. खामगाव, जि.बुलढाणा) याच्याशी ऑगस्ट २०२४ मध्ये झाली. विश्वजीत सिसोदे याने पीडित तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत जळगाव एमआयडीसीतील एका हॉटेलमध्ये नेवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिच्या सोबत काढलेले व्हिडीओ आणि चॅटींग पीडित तरूणीच्या आई-वडिलांना दाखविण्याची भीती दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तसेच पीडित तरूणीच्या वडिलांना व्हॉटसॲपवरून वारंवार जीवेठार मारण्याच्या धमक्या दिल्या.
याप्रकरणी पीडित तरूणीने अखेर एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यावरुन संशयित आरोपी विश्वजीत विठ्ठलसिंग सिसोदे याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे करीत आहे.