कामावरून परतत असताना पाय घसरून तरुणाचा मृत्यू
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील ४५ वर्षीय कष्टकरी संजय मणिलाल पाटील यांचा ३ मार्च रोजी गिरणा नदीत पाय घसरून बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली, ज्यामुळे संपूर्ण आव्हाणे गावावर शोककळा पसरली आहे.
संजय पाटील हे एका मिस्तरीकडे कामाला होते. मंगळवारी धरणगाव तालुक्यातील काम आटोपून ते पायी आव्हाणे गावाकडे परतत होते. दुपारी नदीतून जाताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते खोल पाण्यात बुडाले. नदीकाठी उपस्थित नागरिकांनी तातडीने धाव घेत संजय यांना बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
आव्हाणे परिसरात गिरणा नदीत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वाळू उपसा सुरू आहे. या बेकायदेशीर उत्खननामुळे नदीच्या अनेक भागात खोल आणि धोकादायक डोह निर्माण झाले आहेत. स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे की, या डोहांचा अंदाज न घेतल्यामुळे संजय पाटील यांचा पाय घसरून मृत्यू झाला. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मयत संजय पाटील यांच्या पश्चात पत्नी, १० वर्षांचा मुलगा आणि वडील असा कुटुंब आहे. घरातील कर्ता पुरुष असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिकारी धनराज पाटील पुढील तपास करीत आहेत.
या घटनेने आव्हाणे गावात शोक आणि संतापाची लाट निर्माण केली असून, स्थानिकांनी नदीत असलेल्या धोकेदायक परिस्थितीबाबत प्रशासनाची दखल घेण्याची मागणी केली आहे.
