
मानसिक विवंचनेतून पाचोरा तालुक्यातील नाचनखेडा येथील ३७ वर्षीय तरुणाने विषारी औषध सेवन केले
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
पत्नी माहेरी गेल्यानंतर निर्माण झालेल्या मानसिक विवंचनेतून पाचोरा तालुक्यातील नाचनखेडा येथील ३७ वर्षीय तरुणाने विषारी औषध सेवन केले. उपचार सुरू असताना शुक्रवारी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी त्याचा मृत्यू झाला. याबाबत जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
समाधान संतोष पाटील (वय ३७, रा.नाचनखेडा) असे मयत तरुणाचे नाव आहे.नाचनखेडा येथे पत्नी, दोन मुले आणि आई-वडिलांसह वास्तव्यास असलेले समाधान पाटील हे प्लंबरचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नी लहान मुलीला घेऊन माहेरी गेली होती आणि ती परत येत नव्हती. या कारणामुळे समाधान मोठ्या मानसिक तणावाखाली होते.
दरम्यान, १२ नोव्हेंबर रोजी त्यांनी राहत्या घरी विषारी औषध सेवन केले. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तातडीने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) दाखल करण्यात आले. दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शुक्रवारी सकाळी ७ वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. समाधान पाटील यांच्या निधनाने पाटील कुटुंबीयांवर आणि संपूर्ण नाचनखेडा गावावर शोककळा पसरली आहे. मृत्यूची बातमी समजताच रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती.
याप्रकरणी जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पाटील पुढील तपास करीत आहेत.


