पोलिसांच्या कारवाईत दोन संशयित ताब्यात
साईमत/अमळनेर /प्रतिनिधी –
अमळनेर शहरातील मेहेतर कॉलनी परिसरात जुन्या वादातून २७ जानेवारीच्या रात्री एका तरुणावर बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुरूवारी, २९ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये दोन संशयित आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शाहरुख खान रहिम खान पठाण (वय ३४, रा. चुनाधामी, गांधीलीपुरा) हे मंगळवारी, २७ जानेवारी रोजी रात्री सुमारे १ वाजता मुस्लिम कब्रस्तान परिसरातून जात असताना ही घटना घडली. जुन्या भांडणाची कुरापत काढून संशयित आरोपी विक्की घोगले आणि दिपक प्रभुदास लोहरे यांनी शाहरुख यांना अडवून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
शाहरुख यांनी विरोध केला असता, दोन्ही आरोपींनी त्यांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाण इतकी भीषण होती की, आरोपी दिपक लोहरे यांनी हातातील लाकडी दांडक्याने शाहरुख यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर जोरात प्रहार केला. तर दुसऱ्या आरोपीने शाहरुख यांच्या डाव्या हाताच्या दंडावर मार करून गंभीर जखमा केल्या.
शाहरुख यांनी मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर गल्लीतील नागरिक धावून आले आणि त्यांना आरोपींच्या तावडीतून सुटका केली. या घटनेनंतर अमळनेर पोलीस ठाण्यात तत्काळ गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोहेकॉ विनोद भोई करत आहेत.
अमळनेर परिसरातील रहिवाशांमध्ये या घटनेमुळे चिंता आणि संताप पसरला असून, पोलीस प्रशासन तातडीने कारवाई करत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
