पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली
साईमत/ पारोळा/प्रतिनिधी :
तालुक्यातील होळपिंप्री येथील २८ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा विहिरीतून पाणी काढत असताना पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.कल्पेश गोरख पाटील असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. कल्पेश पाटील हे मका कणीस मोडनीसाठी शेतात गेले होते.
यावेळी विहीरीवर ते पाणी काढण्यासाठी गेले असता त्यांचा अचानक पाय घसरून तोल जाऊन ते विहीरीत पडले. पावसामुळे विहिरीचे पाणी जास्त असल्याने व पोहता येत नसल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागला. बराच वेळ होऊनही मुलगा परत न आल्याने वडील गोरख पाटील हे बघण्यासाठी विहिरीजवळ गेले असता, ही घटना उघडकीस आली. दरम्यान, सायंकाळ झाल्याने गावातील अनेक जणांना बोलवून रात्री विहिरीत इतर साधनांचा उपयोग करून कल्पेश पाटील यांना शोधण्याचा प्रयत्न केला असता ते मिळून आले नाही.
सकाळी पोहणाऱ्या अनुभवी व्यक्तींना बोलावून कल्पेश पाटील यांना बाहेर काढण्यात यश आले. याबाबत अजित पाटील यांच्या माहितीवरून पारोळा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.