साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी शुक्रवारी, २१ जून रोजी जागतिक योग दिनानिमित्त योगाविषयी मार्गदर्शन करुन योगाचे धडे देण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांनीही योगा करुन जीवनातील योगाचे महत्त्व जाणून घेऊन विद्यार्थ्यांसह उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यामुळे सर्वत्र योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
‘महिला सशक्तीकरणासाठी योग साधना’वर मार्गदर्शन
येथील पतंजली योगपीठामार्फत दहावा जागतिक योग दिन महोत्सव महिला योग साधकांमार्फत साजरा करण्यात आला. याप्रसंगी ‘महिला सशक्तीकरणासाठी योग साधना’ विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक गजानन माळी यांनी योग साधनेचे आयुष्यातील महत्त्व व महिलांच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्याच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणामध्ये मोलाचे ठरेल, असे सांगितले. याप्रसंगी विविध योगासन आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिक उपस्थित महिला साधकांनी केली. याप्रसंगी प्रमुख योगसाधक प्रतिभा पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा शिंदे यांच्यासह महिला योग साधक उपस्थित होत्या. कार्यक्रमाला खा.स्मिताताई वाघ, संदीप घोरपडे यांचे सहकार्य लाभले. यशस्वीतेसाठी जिल्हा प्रभारी ज्योती पाटील, तालुका प्रभारी रत्ना भदाणे, योगशिक्षिका कामिनी पवार, आरती पाटील, सविता पाटील आदींनी परिश्रम घेतले. शेवटी रत्ना भदाणे यांनी आभार मानले.
सरस्वती विद्या मंदिर
येथील सरस्वती विद्या मंदिरात आंतरराष्ट्रीय योग दिवस विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी योग प्रात्यक्षिक करून साजरा केला. मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात योगाचे महत्त्व व योगक्रियांच्या माध्यमातून होणारा विकास याबद्दलची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. याप्रसंगी उपशिक्षक ऋषीकेश महाळपुरकर यांनी विद्यार्थ्यांना योग प्रात्यक्षिक करून दाखविले. यशस्वीतेसाठी उपशिक्षक आनंदा पाटील, धर्मा धनगर, शितल पाटील आदींनी परिश्रम घेतले.
लोकमान्य विद्यालय, नवीन मराठी शाळा
लोकमान्य विद्यालय आणि नवीन मराठी शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिवस सामूहिकरित्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व तसेच नियमित योगा केल्याने जीवनात होणारे फायद्याची माहिती देण्यात आली. यासाठी प्रमुख पाहुणे योगागुरू प्रतिभा पाटील यांनी योगाचे विविध प्रकार व आसने करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी काही योगा प्रकार उत्साहात केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नवीन मराठी शाळेचे मुख्याध्यापक मच्छिंद्र मोरे, लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर महाजन तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
देवगाव देवळी हायस्कुल
देवगाव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कुलमध्ये जागतिक योगा दिवस साजरा करण्यात आला. योगाच्या प्राचीन भारतीय पद्धती, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी त्याचे बहुआयामी फायदे याबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा केला जातो, असे स्काऊटचे शिक्षक एच.ओ.माळी, एस.के.महाजन यांनी विद्यार्थ्यांना योगाचे विविध प्रकाराचे प्रात्यक्षिक करून माहिती दिली.
भारतीय धर्म संस्कृतीमधील ‘योग’ संकल्पनेची मांडणी श्रीमद्भगवतगीता ग्रंथात केलेली आहे. त्याच जोडीने भगवान पतंजली मुनी यांनी आपल्या योगसूत्राद्वारे मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाची संकल्पना स्पष्ट केली आहे. याद्वारे आध्यात्मिक उन्नतीही साधता येते, असे पातंजल योगसूत्र ग्रंथात सांगितले आहे. जगभरातून स्वीकारले गेलेले भारतीय संस्कृतीतील योगाचे महत्त्व अधोरेखित होण्याचे प्रयत्न या दिवसानिमित्त होते, असे शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले.
यावेळी शाळेचे शिक्षक आय.आर.महाजन, एस.के.महाजन, अरविंद सोनटक्के, शिक्षकेतर कर्मचारी संभाजी पाटील, गुरुदास पाटील तसेच आठवी, नववी, दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते.
आर्मी स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज
येथील विजयनाना पाटील आर्मी स्कुल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा करण्यात आला. निवृत्त प्राचार्य एस.यु.पाटील, क्रीडा शिक्षक आर.ए.घुगे यांनी योगाचे महत्त्व विशद करून विविध योगाचे प्रात्यक्षिके करून दाखवली. प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील, प्रभारी मुख्याध्यापक बी.डी.पाटील, ज्येष्ठ शिक्षक एस.ए.बाविस्कर यांनी योगशिक्षक एस.यु.पाटील यांचा सत्कार केला. यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन उमेश काटे तर संजय पाटील यांनी आभार मानले.