शहरातील बोरावल गेट परिसरात अवैध देशी बनावटीचे गावठी पिस्तूल
साईमत/ यावल/प्रतिनिधी :
यावल शहरातील बोरावल गेट परिसरात अवैध देशी बनावटीचे गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतूस घेऊन विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना यावल न्यायालयात हजर केले असता दि.२८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार युवराज उर्फ युवा राजू भास्कर (वय ३४, रा.बोरावल गेट,यावल) हा आपल्या ओळखीचा भूषण कैलास सपकाळे (वय ३१ रा. वराडसिम, डॉ. आंबेडकरनगर, ता. भुसावळ) याला विक्रीसाठी गावठी पिस्तूल आणला होता. पोलिसांनी सापळा रचून दोघांना पकडले. त्यांच्या अंगझडतीत गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतूस व दोन मोबाईल हॅण्डसेट असा एकूण ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
चौकशीत युवराज भास्कर याने यापूर्वी तीन गावठी पिस्तुल व सहा जिवंत काडतुसे विकत घेतल्याचे सांगितले. त्यापैकी दोन पिस्तुल व चार काडतूस त्याने अमळनेर येथील आपल्या ओळखीच्या अनिल चंडाले याला ४० हजार रुपयांना विकले असल्याचे त्याने कबूल केले. आरोपींकडील शस्त्रांना कोणताही परवाना नसल्याचेही स्पष्ट झाले. दोघांविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यांतर्गत कलम ३(१), २५(१-ब), ५(१), २५(१)(अ), २९ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
यावल येथील गावठी पिस्तूल प्रकरणाच्या चौकशीतून आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. तालुक्यातील एका पत्रकाराने काही अवैध धंद्यांवर दोन-तीन प्रकरणे कायदेशीर पद्धतीने वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली होती. त्यामुळे चिडलेल्या एका अवैध धंदे चालकाने या प्रकरणातीलच एका आरोपीला केवळ पाच हजार रुपयांची रक्कम देऊन संबंधित पत्रकाराला ठार मारण्याची सुपारी दिल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. मात्र, आरोपीने आपली नैतिकता दाखवत ती सुपारी नाकारली. या घडामोडीमुळे आता पोलिस तपासाची दिशा महत्त्वाची ठरणार आहे. जर सखोल चौकशी करण्यात आली तर सदर अवैध धंदे चालकाचाही या गुन्ह्यात सहभाग उघड होऊ शकतो, असे बोलले जात आहे.