विटनेर येथे शारदीय नवरात्रोत्सवनिमित्त उद्या यात्रोत्सव
साईमत/ चोपडा/प्रतिनिधी :
तालुक्यातील विटनेर येथे शारदीय नवरात्रोत्सव निमित्ताने चामुंडा माता मंदिरात उद्या दि.३० रोजी यात्रेचे आयोजन मंदिर समिती कडून करण्यात आले आहे . विटनेर येथे कुलस्वामिनी चामुंडा माता मंदिर असून हे मंदिर परिसरातील भाविकांसाठी श्रद्धास्थान मानले जाते. संपूर्ण दगडी बांधकाम असलेल्या या मंदिरात काळभैरव, गणपती यांची स्थापना मंदिर आवारात करण्यात आली आहे. हे मंदिर वर्षभर भक्तासाठी उघडे असते. मंदिरात सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेस आरती करण्यात येते. नवरात्र उत्सव काळात संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण असते.
तसेच हजारो भाविक येथे दर्शनाला येतात. चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्रला या मंदिरात विशेष भाविकांची मोठी गर्दी होते. यंदा पासून अष्टमीच्या दिवशी दिनांक ३० मंगळवारी मंदिर परिसरात यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर समिती कडून भाविकांनी यात्रा निमित्ताने चामुंडा मातेच्या दर्शनासाठी यावे असे आवाहन करण्यात आले आहे.