मुलींचा ऐतिहासिक विजय
साईमत/ मलकापूर /प्रतिनिधी :
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा, जिल्हा क्रीडा परिषद वर्धा तसेच वर्धा चॉकबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ते १५ डिसेंबर २०२५ दरम्यान आयोजित केलेल्या शालेय राज्यस्तरीय चॉकबॉल स्पर्धेत यशोधाम पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज, मलकापूर येथील १९ वर्षांखालील मुलींच्या संघाने प्रथमच ऐतिहासिक यश संपादन करत अमरावती विभागाचे, शाळेचे तसेच जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल केले.
अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करत यशोधामच्या मुलींच्या संघाने जिद्द, शिस्त, संघभावना आणि अथक परिश्रमाच्या जोरावर आपला ठसा उमटवला. हा विजय केवळ एक स्पर्धात्मक यश नसून यशोधाम पब्लिक स्कूलच्या दर्जेदार क्रीडा संस्कृतीचा व सातत्यपूर्ण मार्गदर्शनाचा गौरव आहे. अमरावती विभागाचा पहिला सामना नाशिक विभागाविरुद्ध झाला, ज्यामध्ये अमरावती विभागाने १८–२६ अशा फरकाने विजय मिळवला. त्यानंतर स्पर्धेचे यजमान नागपूर विभागाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या सामन्यात अमरावती विभागाने १२–२८ अशा ठोस फरकाने सामना आपल्या नावावर केला.
यानंतर झालेल्या अंतिम सामन्यात मागील वर्षीचा विजेता मुंबई विभाग आणि अमरावती विभाग आमनेसामने आले. या निर्णायक सामन्यातही अमरावती विभागाने एकतर्फी वर्चस्व राखत विजय खेचून घेतला आणि या स्पर्धेत आपले नाव सुवर्णाक्षरात कोरत नवा इतिहास रचला. ऐतिहासिक विजयात विजयी संघामधील कर्णधार शैरीश शेख, तसेच प्राची जोहरी, सानिका पाटील, वेदिका राऊत, संस्कृती कोळी, धनश्री चरखे, मैथली राणे, भक्ती पाटील, तेजल राजपूत, भूमी जावळेकर, अंजनी पाटील व सिद्धी मामानकर या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संघाला विजेतेपद मिळवून दिले.
स्पर्धेत यशोधाम पब्लिक स्कूलसाठी आणखी एक अभिमानाची बाब म्हणजे, सानिका अरुण पाटील हिला ‘उत्कृष्ट महाराष्ट्र डिफेंडर’, तर प्राची संदीप जोहरी हिला ‘उत्कृष्ट महाराष्ट्र शूटर’ म्हणून गौरविण्यात आले. महाराष्ट्रातील विविध विभागांतून त्यांची निवड होणे ही शाळा, संघ आणि जिल्ह्यासाठी अत्यंत गौरवाची बाब ठरली. या यशामागे अमरावती विभागाच्या मुख्य प्रशिक्षक धनश्री अगलावे मॅडम, तसेच डॉ. प्रफुल्ल वानखेडे आणि सौ. अनिता प्रफुल्ल वानखेडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
ऐतिहासिक विजयाबद्दल शाळेचे दूरदृष्टी असलेले मार्गदर्शक संचालक डॉ. वैभव महाजन यांनी सांगितले की, यशोधाम पब्लिक स्कूलचे विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकावेत, हाच आमचा ध्यास आहे. तसेच प्राचार्या उषा यांनी विद्यार्थिनींच्या कष्टाचे कौतुक करत, संघभावना, शिस्त आणि आत्मविश्वास यामुळेच हा ऐतिहासिक विजय शक्य झाला, असे गौरवोद्गार काढले.
यशाबद्दल चॉकबॉल सचिव. विजय पळसकर, धीरज चवरे, संदीप मुंडे, विनायक क्षीरसागर, पंकज आगलावे, आनंद जगदाळे, विशाल भोपळे तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी खेळाडूंचे कौतुक केले आहे.
