साईमत, जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील तोंडापूर परिसराला लागून असलेल्या सोयगाव तालुक्यातील राक्षा शिवारात संतापजनक घटना समोर आली आहे. आंतरजातीय प्रेमसंबंधाच्या कारणावरून दोन भावांनी आई-वडील यांच्या चिथावणीवरून बहिणीची हत्या करुन ‘यमसदनी’ धाडले आहे. ‘मला वाचवा, कोठेतरी लपवा माझे भाऊ, आई-वडील मला मारून टाकतील’, असे ओरडत ती महिला राक्षा शिवारात आली असताना फिर्यादीने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशयितांनी दांडगाई करीत फिर्यादीला मारहाण केली. नंतर स्वतःच्या बहिणीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली. याप्रकरणी फर्दापूर पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सर्व संशयितांना अटक केल्याची माहिती ए.पी.आय. भरत मोरे यांनी दिली. याप्रकरणी तोंडापूर येथील शमीम शहा कासम शहा (वय ३०) यांनी फिर्याद दिली आहे.
सविस्तर असे की, तोंडापूर येथील शमीम शहा कासम शहा हे गावात मजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या शेताच्या वरच्या बाजुला असलेल्या शेतात गावातीलच धोंडीबा सांडु बावस्कर यांची शेतजमीन व घर आहे. धोंडीबा हे त्यांचे परिवारासह त्यांची पत्नी शेवंताबाई, दोन मुले शिवाजी व कृष्णा तसेच मुलगी चंद्रकला असे राहतात. त्यांची मुलगी चंद्रकला ही मागील पाच वर्षापासून तिचे आणि तिच्या सासरच्या मंडळींचे पटत नसल्याने सासरी न राहता ती राक्षा शिवारातील त्यांच्या शेतवस्तीवरच राहत होती. फिर्यादीचा भाऊ रहीम शहा आणि चंद्रकला यांचे खुप वर्षापासून प्रेमसंबंध होते. हे संबंध चंद्रकलाच्या घरच्यांना मान्य नव्हते. सुमारे एक महिन्यापूर्वी रहीम आणि चंद्रकला असे दोघेजण लग्न करण्यासाठी तोंडापूर येथून सुरत येथे पळुन गेले होते. परंतु सर्वांनी त्यांची दोघांचीही समजुत घालून मुलगी चंद्रकला हिला तिचे आई-वडिलांच्या ताब्यात पहुर पोलीस ठाणे येथे दिले होते. तेव्हापासून चंद्रकलाबाई हिला तिचे आई-वडील आणि भाऊ हे रहीमसोबत असलेल्या प्रेमसंबंधामुळे नेहमीच मारहाण करुन तिला जीवंत ठेवायचे नाही, असे वाद निर्माण होत होते.
‘चंद्रकलाला मारुन टाका… जीवंत ठेवू नका’
फिर्यादी शमीम शाह हे शनिवारी, १६ सप्टेंबर रोजी सकाळी नेहमीप्रमाणे शेडवर काम करत होते. तेव्हा सकाळी ९ वाजेच्या सुमारास धोंडीबा बावस्कर यांची मुलगी चंद्रकला ही पळतच फिर्यादीच्या शेडवर आली व म्हणाली की, माझे भाऊ, आई-वडील हे मला मारुन टाकणार आहेत. मला वाचवा… मला तुम्ही कोठेतरी लपवा…, असे बोलत होती. तेव्हा फिर्यादीने तिला बकऱ्यांच्या शेडमध्ये लपण्यासाठी सांगितले. ती शेडमध्ये बकऱ्यांमध्येच लपली होती. तेवढ्यात तेथे मयत चंद्रकला हिचे भाऊ कृष्णा व शिवाजी बावस्कर असे दोघेजण पळतच आले. फिर्यादीला पकडुन चापट-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या दोघांच्या हातामध्ये कुऱ्हाडी होत्या. तेव्हा शिवाजी व कृष्णा या दोघांनी चंद्रकला लपलेल्या शेडमध्ये जावून पाहिले. तेव्हा कृष्णाने चंद्रकलाला बकऱ्यांमधुन ओढले आणि त्यांच्या हातातील कुऱ्हाडीने चंद्रकलाच्या डोक्यात मारुन तिला जीवे ठार मारले. दुसरा भाऊ शिवाजीनेही त्याच्या हातातील कुऱ्हाडीचे पाते चंद्रकलाच्या डोक्यात मारले. तेव्हा चंद्रकलाचे आई-वडील तिथे आले व त्यांनी परत फिर्यादीला चापट बुक्क्यांनी मारहाण केली. ते शिवाजी व कृष्णा यांना ‘चंद्रकलाला मारुन टाका… जीवंत ठेवू नका’, असे सांगत होते. तेव्हा फिर्यादीने धोंडीबा बावस्कर यांच्या हाताला झटका मारुन तेथुन पळून गावाकडे पळत येत आला. त्यानंतर भाऊ, वडिलांसह फिर्यादीने पहूर पोलीस ठाणे गाठले. नंतर, ही घटना फर्दापूर पोलीस ठाणे हद्दीतील असल्याने फिर्यादी शमीम शाह याने तेथे फिर्याद दाखल केली. त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
आई-वडिलांसह दोन्ही भावांना पथकाकडून अटक
घटनेची माहिती मिळताच फर्दापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भरत मोरे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. संशयित सर्व आरोपी मयत चंद्रकला हिचे भाऊ कृष्णा धोंडीबा बावस्कर, शिवाजी धोंडीबा बावस्कर, वडील धोंडीबा सांडु बावस्कर, आई शेवंताबाई धोंडीबा बावस्कर यांना अटक केली असल्याची माहिती ए.पी.आय. भरत मोरे यांनी दिली. तपास ए.पी.आय. भरत मोरे करीत आहे.