वरणगावला जुना वाद उफाळून तरुणाला धाडले ‘यमसदनी’

0
22

साईमत, वरणगाव : प्रतिनिधी

शहरात तीन महिन्यांपूर्वी झालेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी मंगळवारी, ४ जून रोजी दुपारी एकावर चाकुचे सपासप वार केल्याने त्याला ‘यमसदनी’ धाडले आहे. याच घटनेत इतर तीन जण जखमी झाले आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे .

सविस्तर असे की, वरणगाव शहरातील गौसिया नगर (सिनेमा रोड) आणि उमर कॉलनी भागातील दोन गटामध्ये पाच-सहा महिन्यांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर त्याचे रुपांतर तुफान हाणामारीत झाले होते. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, या वादाची दोन्ही गटातील एकमेकांच्या विरुद्ध धुसफुस सुरूच होती. त्याचेच रूपांतर मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास खुनात होवून सिनेमा रोड चौकातील क्वॉलिटी जनरल स्टोअर्सलगत उभा असलेल्या आरीफ अली समद अली सय्यद (वय ३०) आणि मुश्‍ताक अली सय्यद (वय ४५), आकीब अली कमर अली सय्यद (वय २५), समीर खान अजीज खान (वय २४, सर्व रा.गौसिया नगर, सिनेमा रोड) यांच्यावर दोन ते संशयितांनी चाकुने वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या आरीफ अली समद अली सय्यद याला गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला होता. इतर जख्मींना गोदावरी रुग्णालयात दाखल केले आहे.त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. घटनेतील संशयित आरोपी पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या सिनेमा रोड चौकात दुपारच्या वेळेस असलेल्या शांततेची संधी साधून हल्लेखोरांनी चौघांवर चाकुने वार करीत घटनास्थळावरून लागलीच पळ काढला. घटनेत जख्मी झालेल्यांनी धावपळ सुरू झाल्याने ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्ताचे थारोळे पडले होते. रक्ताचे नमुने जळगाव येथील फॉरेन्सिक लॅबचे पो.हे.कॉ. निलेश भावसार, पो.कॉ. हरीष परदेशी यांच्या पथकाने घेतले आहे.

घटनेची वार्ता शहरात पसरताच एकच खळबळ उडाली. घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी राजकुमार शिंदे यांनी भेट देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली ए.वी.आय. भरत चौधरी, पोलीस कर्मचारी तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here