साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील तळोंदे प्र.दे. येथे सालदार म्हणून काम करणाऱ्या पतीने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन तिचा खून करुन तिला ‘यमसदनी’ धाडले आहे. मंगळवारी, २६ सप्टेंबर रोजी रात्री पत्नीचा गोठ्यातच खून करून रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह घरातच पहाटे सकाळपर्यंत पडून होता. सकाळी शेतमालक शेतात दूध काढण्यासाठी शेतात गेल्यावर सालदार हा गोठ्याला कडी लावून बाहेर बसलेला होता. शेतमालकाने विचारणा केल्यानंतर त्याने पत्नीचा खून केल्याची माहिती दिली. शेतमालकाने मेहुणबारे पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांनी सालदाराला ताब्यात घेतले आहे. त्याने पत्नीच्या खुनाची कबुली दिली आहे. याप्रकरणी मेहूणबारे पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे की, रामेश्वर रूपचंद राठोड (रा. हिंगणे देहरे, ता. नांदगाव ह.मु.तळोंदे प्र.दे., ता.चाळीसगाव) यांनी त्यांच्या शेतात दुग्ध व्यवसायासाठी म्हशी, गायी व इतर जनावरे पाळलेले आहे. जनावरांच्या देखभालीसाठी पंधरा दिवसापूर्वीपासूनच राजेश जगन पावरा (बारेला) आणि त्याची पत्नी शिवानी राजेश पावरा (२५, दोन्ही रा. रोहिणी भोईटी, ता. शिरपूर, जि. धुळे) यांना कामावर ठेवलेले होते. त्यांच्यासोबत त्यांचे दोन मुलेही सोबत वास्तव्याला होते. राजेशचे कुटुंब हे शेतावर कामावर येण्यापूर्वी पिंपळवाड म्हाळसा येथे एका पोल्ट्री फॉर्मवर कामाला होते. कामावर आल्यापासून पती-पत्नीत कायम वाद निर्माण होत होते. राजेश हा त्याच्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन कायम शिवीगाळ व मारहाण करीत होता. सोमवारी, २५ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास रामेश्वर राठोड हे घरी असतांना शेतावर काम करणाऱ्या राजेशचे दोन्ही मुले शंकर आणि राकेश हे घरी आले. त्यांनी त्यांचे वडील हे त्यांच्या आईला मारहाण करत असल्याचे सांगुन तुम्ही लवकर शेतात चला, असे सांगितल्यावरुन राठोड तातडीने शेतात धावत गेले.
चारित्र्यावरील संशयाचे ‘भुत’ शिरले डोक्यात
राजेशने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला होता. त्यामुळे त्याच्या डोक्यात संशयाचे ‘भुत’ शिरले होते. त्यामुळे राठोड यांनी दोघांनाही समजावून घरी परतले होते. त्यानंतर ते बुधवारी, २७ सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास इतर मजुरांसह शेतात गेले. तेव्हा राजेश पावरा खाटेवर बसलेला दिसला. जनावरांची आवर सावर केलेली दिसली नाही, असे विचारल्यावर त्याने पत्नी शिवानी हिच्या बाहेरख्यालीपणाला कंटाळून तिला समजावून सांगूनही ती ऐकत नसल्याने तिचा खून केल्याचे पावरा यानेे सांगितले.
रक्ताच्या थारोळ्यात पडली होती ‘शिवानी’
घरात जावून शेतमालक राठोड यांनी पाहिल्यावर ‘शिवानी’ ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. त्यानंतर राठोड यांनी लागलीच ही माहिती पोलीस पाटील यांना दिली. या घटनेची माहिती मेहुणबारे पोलिसांना मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णु आव्हाड यांच्यासह सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. चाळीसगाव उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांनी भेट देवून माहिती जाणून घेतली. याप्रकरणी रामेश्वर राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेश पावरा याच्या विरोधात मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.