अनैतिक संबंधातून महिलेला धाडले ‘यमसदनी’

0
25
Oplus_0

साईमत/ न्यूज नेटवर्क/जामनेर :

तालुक्यात खुनांचे सत्र थांबायला तयार नाही. तालुक्यातील शहापूर येथे एका महिलेचा अनैतिक संबंधातून दगडाने चेहरा ठेचून निर्घृणपणे खून करुन तिला ‘यमसदनी’ धाडल्याची धक्कादायक घटना सोमवारी, १ जुलै रोजी सकाळी साडेदहा ते ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.संशयित आरोपीला तळेगाव येथील ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

संगीताबाई पिराजी शिंदे (वय ३६, रा. शहापूर, ता. जामनेर) असे मयत महिलेचे नाव आहे. ती विधवा असुन दोन मुलांसह शहापूर येथे राहत होती. तिला विदर्भामधील अमरावती जिल्ह्यात दिलेले होते. महिलेचा पती १०-१२ वर्षांपासून तिला सोडून गेल्यामुळे ती आपल्या दोन मुलांसह माहेरी शहापूर येथे राहत होती. तळेगाव येथील संशयित आरोपी किरण संजय कोळी उर्फ लहान्या (वय ३०, रा.तळेगाव) याच्यासोबत तिचे काही महिन्यांपासून अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. १ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास संशयित किरण कोळी हा संगीताबाई हिच्या घरी मद्यधुंद अवस्थेत आला होता. त्याठिकाणी दोघांमध्ये आर्थिक कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संशयित किरण कोळी याने महिलेला मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर तिच्या घरातच तिच्या चेहऱ्यावर दगड टाकून आणि लाकडी दांडक्याने तिचा खून केला.

मृतदेह हलविला उपजिल्हा रुग्णालयात

ग्रामस्थांना त्याची खबर लागताच त्यांनी संशयित किरण कोळी याला तळेगाव येथून पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत महिलेचा मृतदेह हा जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आला. जामनेर जिल्ह्यात पुन्हा एकदा खून झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. मयत संगीता शिंदे यांना १२ वर्षाची मुलगी आणि ८ वर्षाचा मुलगा आहे. ते मात्र पोरके झाले असून त्यांच्यावरील आईचे छत्र हरपले आहे. तपास पो.नि. किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दीपक रोटे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here