‘आम्ही सिद्ध लेखिका’ संस्थेच्या शाखेतर्फे काव्यधारा काव्य संमेलनाला मिळाला प्रतिसाद
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
कविता ही सुख-दुःखाच्या आंदोलनाची कहाणी असते. मनाचे सर्व संस्कार कवितेतून फुलतात. कविता ही समाजातील मूल्यांची पडझड थांबवते. निर्मळ समाज बांधणीचे कार्य कवितेतून होते. बालकवी आणि बहिणाबाईप्रमाणे सर्व सिद्ध लेखिकांनी निसर्गासह मातीशी एकरूप होऊन साहित्य निर्मिती करावी, असा मोलाचा संदेश कवयित्री माया धुप्पड यांनी कवयित्रींना दिला. जळगाव येथील ‘आम्ही सिद्ध लेखिका’ समूह शाखेतर्फे आयोजित ‘काव्यधारा’ काव्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी काव्य संमेलनाध्यक्ष म्हणून त्या अध्यक्षीय भाषणातून बोलत होत्या.
‘आम्ही सिद्ध लेखिका’ संस्थेच्या शाखेतर्फे काव्यधारा काव्य संमेलनाचे रविवारी, ३ ऑगस्ट रोजी जळगावातील अभियंता भवन येथे आयोजन केले होते. संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री माया धुप्पड होत्या. संमेलनाच्या उद्घाटक संस्थेच्या खान्देश विभाग प्रमुख प्रा. संध्या महाजन तर संमेलनाच्या स्वागताध्यक्ष कवयित्री जयश्री काळवीट होत्या. संमेलनास ज्येष्ठ साहित्यिक प्रा. विमल वाणी, ललिता टोके, बहिणाबाई चौधरी यांच्या कुटुंबातील सदस्य स्मिता चौधरी, बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या वंशज विशाखा कुलकर्णी यांची उपस्थिती लाभली.
कवयित्री जयश्री काळवीट यांनी सर्व उपस्थित कवयित्रींचे स्वागत करत समूहाची सदस्य संख्या वाढवून समूहाच्या ब्रीद वाक्याप्रमाणे “लिहा आणि लिहिते व्हा!” असा प्रेमळ आग्रह सर्वांना केला. उद्घाटनपर भाषणात प्रा.संध्या महाजन यांनी ‘आम्ही सिद्ध लेखिका’ समूहाचा आजवरचा प्रवास कथन करत स्त्रियांसाठी खास हक्काच्या असलेल्या जागतिक व्यासपीठाचा लाभ सर्व सिद्ध लेखिकांनी घ्यावा, असे आवाहन केले.
कवितांनी मिळविली रसिकांची दाद
जिल्ह्याभरातून आलेल्या दिग्गज कवयित्रींनी दुपारच्या सत्रात विविध विषयांवर उत्तमोत्तम कविता सादर करत कवी संमेलन एका वेगळ्या उंचीवर नेऊन पोहचविले. विशेषतः धरणगावच्या कवयित्री मनिषा पाटील यांनी खास अहिराणी भाषेतील सादर केलेल्या ‘बाप तू अन मना’, कवयित्री छाया पवार-पाटील यांची ‘राखीचा सण’, रीता राजपूत यांची ‘महिला हिताचं भूत’, हर्षदा जगताप यांची ‘मी श्रावण’, रजनी पाटील-अमळनेर यांची ‘पंढरीची वारी’, रेखा मराठे यांची ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी’, प्रियदर्शिनी भोसले यांची ‘यमाची भेट’, विमल वाणी यांचे ‘सुंदर भारुड’ अशा काव्यसरी लक्षवेधी ठरल्या. तसेच ज्योती राणे, ज्योती वाघ, पुष्पलता कोळी, इंदिरा जाधव, मंजुषा पाठक यांच्या कवितांनी रसिकांची दाद मिळवली. सर्व निमंत्रित कवयित्रींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्हासह प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
४५ कवयित्रींनी कविता सादर करत घेतला आनंद
कविसंमेलनास जळगावसह जामनेर, अमळनेर, धरणगाव, चोपडा, भुसावळ अशा विविध ठिकाणांहून ४५ कवयित्रींनी आपापल्या कविता सादर करत काव्यधारांचा आनंद घेतला. यशस्वीतेसाठी शाखेच्या कार्यकारिणी सदस्य संगिता महाजन, संध्या भोळे, इतर ज्येष्ठ सदस्या इंदिरा जाधव, पुष्पलता कोळी, मंजुषा पाठक, विशाखा देशमुख, सुनिता येवले यांनी परिश्रम घेतले.प्रास्ताविक पुष्पा साळवे, सूत्रसंचालन संस्थेच्या उपाध्यक्ष ज्योती राणे तर आभार ज्योती वाघ यांनी मानले.