साईमत, चोपडा : प्रतिनिधी
नवरात्रीचा सण संयम, सहिष्णुता, भक्ती, सामर्थ्य, तपश्चर्या, धैर्य, धर्म, पवित्रता आणि सिद्धी यांचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी प्रतीक म्हणून साजरा केला जातो. या काळात उपवास केला जातो आणि देवीची प्रार्थना केली जाते. हा उत्सव भक्ती, साहित्य, संगीत आणि कला प्रतिबिंबित करतो. समाजातील महिलांचे स्थान मजबूत करते. नवदुर्गेचे गुण अंगीकारून स्त्रीशक्तीचा विस्तार करता येईल. महिलांनी नऊ देवींच्या नऊ गुणांना अंगीकार केले पाहिजे. तसेच समाजातील प्रत्येक जात धर्मातील महिलांचे स्थान मजबुत होईल तीच खऱ्या अर्थाने देवींची पूजा होईल, असे प्रतिपादन चोपडा तालुक्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी केले.
चोपडा तालुक्यातील विटनेर येथे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या हस्ते गावातील सुप्रसिद्ध दैवत चामुंडा माता मंदिरात आरतीचा मान देण्यात आला. तसेच चामुंडा माता संस्थानच्यावतीने त्यांचे सपत्नीक स्वागत करण्यात आले. यावेळी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
गाव हे महिलांच्या सन्मानाबाबत देशात नावाजलेले गाव आहे. येथील पुरुषांनी महिलांना बरोबरीचे अधिकार दिलेले आहेत. येथील लक्ष्मी मुक्ती कार्यक्रम संपूर्ण देशात आदर्श असा कार्यक्रम म्हणून नावाजलेला आहे. चामुंडा माता मंदिराच्या माध्यमातून गावातील बालकांवर आध्यात्मिक संस्कार होताना दिसत आहेत. ह्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. सूत्रसंचालन गजानन पाटील यांनी केले.