
भिमटेकडी, छत्रपती संभाजीनगर येथे होणार ऐतिहासिक सोहळा; २५ देशांतील भिक्खु संघ व एक लाख उपासक सहभागी
साईमत/मलकापूर /प्रतिनिधी :
छत्रपती संभाजीनगर येथील भिमटेकडी परिसर पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर तेजाने उजळणार आहे. सुमारे ७० वर्षांनंतर येथे प्रथमच ‘जागतिक बौद्ध धम्म परिषद’ भव्य आणि ऐतिहासिक पद्धतीने आयोजित करण्यात आली असून २६, २७, २८ फेब्रुवारी ते १ व २ मार्च २०२६ या पाच दिवसांच्या कालावधीत हा सोहळा पार पडणार आहे.
परिषदेतील सहभागी देशांची संख्या तब्बल २५ असून, विविध देशांतील तसेच महाराष्ट्रातील भिक्खु व भिक्खुनी संघ मोठ्या संख्येने दाखल होणार आहेत. त्याचबरोबर एक लाखांहून अधिक उपासक-उपासिका या भव्य सोहळ्यात सहभागी होणार असल्याने छत्रपती संभाजीनगर शहरात आधीच उत्साहाचे वातावरण आहे. यानिमित्ताने छत्रपती संभाजीनगर जागतिक बौद्धधम्म केंद्र म्हणून पुन्हा एकदा आपले स्थान अधोरेखित करणार आहे.
कार्यक्रमासाठी २५ एकरांवर विशाल मंडप उभारण्यात येणार असून, निवास, भोजन, पिण्याचे पाणी, आरोग्यसेवा, सुरक्षा व स्वच्छतेच्या सुविधा अत्याधुनिक पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. संपूर्ण परिषद क्षेत्र सुमारे ५० एकरावर पसरलेले असून गेल्या १० महिन्यांपासून या कामासाठी नियोजन आणि तयारी सुरू आहे. शेकडो स्वयंसेवक, उपासक-उपासिका तसेच सामाजिक कार्यकर्ते श्रमदान आणि आर्थिक सहकार्य देत या ऐतिहासिक उपक्रमात सहभाग घेत आहेत.
या परिषदेला राज्यातील आणि देशातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. पालकमंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक, प्राध्यापक, संपादक, पत्रकार, उद्योजक, साहित्यिक विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील. धम्मतत्त्वांवर आधारीत सांस्कृतिक सादरीकरणे तसेच धम्म शिक्षण, पर्यावरण संवर्धन, धम्मदीक्षा, स्त्रीसक्षमीकरण आणि सामाजिक समता यांसारख्या विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहेत.
पत्रकार परिषदेत मुख्य संयोजक पूज्य भिक्खुनी प्रा.धम्मदर्शना महाथेरी म्हणाल्या, ही परिषद कोणाच्याही मालकीची नाही. ती संपूर्ण मानवतेची आणि सर्व बुद्ध अनुयायांची आहे. प्रत्येकाने आर्थिक, श्रमिक आणि लोकसहभागाने या जागतिक धम्मपरिषदेच्या यशासाठी योगदान द्यावे. त्यांनी पुढे सांगितले की, या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दृष्ट्याही जागतिक ओळख निर्माण करणार आहे.
भिमटेकडी येथे झालेल्या पत्रकार परिषदेला आर्याजी संघशिला, अनिकुमार बस्ते, डॉ. धनराज गोंडाने, विजय मगरे, ऍड. रामेश्वर तायडे, प्रसिद्ध पत्रकार रतनकुमार साळवे, अनिता हिवाळे, सोनाली जोहरे, दीपक लव्हाळे, सुनीत दांडगे, भानुदास डोके, अमोल दांडगे, प्रा. सुनील वाकेकर, जोगेंद्र तायडे, अनिकेत ओव्हाळ, डॉ. प्रकाश इंगळे, मीनाताई काकडे आणि सुधाकर उमाळे आदी मान्यवर उपस्थित होते.


