साईमत जळगाव प्रतिनिधी
विद्यार्थ्यांना कृतीद्वारे विज्ञानाच्या संकल्पना शिकता याव्यात, हे उद्दिष्ट समोर ठेवून सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजक विकास योजना जळगाव यांच्या तर्फे “हँड्स ऑन सायन्स” या कार्यशाळेचे आयोजन महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालय व मानवसेवा मंडळ माध्यमिक विद्यालयात करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून एसडी-सीड गव्हर्निंग बोर्ड सदस्य तसेच कुतूहल फाउंडेशनचे संचालक महेश गोरडे हे होते.
शाळेच्या विज्ञान पुस्तकातील फक्त शब्द वाचून व लिहून विज्ञान समजणे केवळ अशक्य आहे. बाल वयातच विद्यार्थ्यांना विज्ञान संकल्पना स्पष्ट न झाल्याने भविष्यातील वेगवेगळ्या परीक्षांमध्ये त्यांना अपेक्षित यश प्राप्त होण्यास अडचणी निर्माण होतात. यावर उपाय म्हणजे बालपणापासूनच मुलांनी स्वानुभव आणि कृतीतून शिकणे गरजेचे आहे असे प्रतिपादन मेह्श गोरडे यांनी केले.
मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांचा विज्ञानाप्रती आत्मविश्वास वाढावा यासाठी त्यांच्याकडून काही प्रात्यक्षिक करवून घेतले. यात त्यांनी मुलांना विविध संकल्पनांवर आधारीत विज्ञान किट्स देऊन विविध मॉडेल बनवून घेतले व त्यामागील वैज्ञानिक संकल्पना समजावून सांगितल्या. यामुळे मुलांमधील विज्ञानाची भीती कमी होऊन विषय सोपा होण्यास नक्कीच मदत झाली.
कार्यक्रमाला मुख्याध्यापक डी. बी. सोनवणे, मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी, एसडी-सीड असोसिएट प्रवीण सोनवणे, मनीषा भालेशंकर, गिरीश जाधव, अनिता शिरसाठ तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी दोनही विद्यालयाचे मुखाय्धापक आणि विद्यालयाचे व्यवस्थापन यांच्या बद्दल एसडी-सीड गव्हर्निग बोर्ड चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.