साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील महाविद्यालयातील इंग्रजी विभागाने विद्यार्थ्यांना रोजगार संबंधी मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. ए.व्ही. काटे होते. कार्यशाळेला ६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
कार्यशाळेत उपप्राचार्य डॉ. ए.व्ही. काटे यांनी विद्यार्थ्यांनी करिअरबद्दल अधिक जागरूक राहून आपले भविष्य घडविण्यासाठी प्रयत्नरत रहावे, असे सांगितले. प्रास्ताविकात इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.आर.आर.बोरसे यांनी कार्यशाळेचा हेतू हा रोजगार मार्गदर्शन आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातील विविध स्पर्धामध्ये भाग घ्यावा आणि महाविद्यालयातील तासिकामध्ये नियमित हजर राहण्याचे आवाहन केले. कार्यशाळेत भुसावळच्या संत गाडगेबाबा इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रा.किशोर चौधरी यांचे व्याख्यान सादर झाले. त्यांनी इंग्रजी भाषेचे करिअर दृष्टीने महत्त्व सांगितले. तस ेच ‘पदव्युत्तर रोजगाराच्या विविध संधी’वर संबोधन केले.
यांनी घेतले परिश्रम
कार्यशाळेत प्राचार्य डॉ .मिलिंद बिल्डीकर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. डी.एल.वसईकर, डॉ.चंदनशिव, डॉ.वीरा राठोड आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या शंकांचेही निरसन करून घेतले. यशस्वीतेसाठी इंग्रजी विभागातील सहकारी डॉ. प्रशांत पाटील, प्रा.प्रतीक अग्रवाल यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन काजल, प्राजक्ता माळी, क्रांती माळी तर लीना जाधव यांनी आभार मानले.