रेल्वे स्टेशन परिसरातील मालधक्क्यावर घडली घटना
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
येथील रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या मालधक्क्यावर काम करताना एका तरुणाच्या डोक्यावर लोखंडी हुक पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी, १८ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. होतकरू आणि कष्टाळू कामगाराच्या मृत्यूमुळे धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
कैलास रमेश माळी (वय २७, रा. पाळधी, ता. धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो लहान भाऊ, काका यांच्यासह पाळधी येथे वास्तव्यास होता. मालधक्क्यावर काम करून उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान, कैलास हा नेहमीप्रमाणे बुधवारी, १८ रोजी कामावर हजर झाला होता. मालधक्क्यावर क्रेनच्या वाहनावर काम करताना अचानक लोखंडी हुक तुटला आणि कैलासच्या डोक्यावर पडला. त्यामुळे त्याला जबर मार बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
कामगारांसह नातेवाईकांची रुग्णालयात गर्दी
ही घटना घडताच आजूबाजूच्या कामगारांनी कैलासला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल केले. त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी हमाल कामगारांसह नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेऊन गर्दी केली होती.