साईमत, पहुर, ता.जामनेर :
जामनेर तालुक्यातील नांद्रा प्र.लो.येथे महिला दिनाचे औचित्य साधून पायोनियर सिडस् लि. कंपनीने महिला दिनानिमित्त महिलांचा गौरव केला. अध्यक्षस्थानी ममता गांगुर्डे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आबासाहेब पाटील, नेरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.कोमल देसले उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाला महिला गटासह गावातील १६० महिला उपस्थित होत्या.
याप्रसंगी डॉ.कोमल देसले यांनी ‘महिलांचे आजार व समस्या’वर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला नांद्रा आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक रवींद्र सूर्यवंशी यांचे सहकार्य लाभले. त्यांनी ‘महिला दिनाचे महत्त्व’वर मार्गदर्शन केले. तसेच पायोनियर कंपनीचे कल्पेश पगारे यांनी महिला शेतकऱ्यांना कंपनी आणि बियाण्यांविषयी माहिती देऊन उत्पन्न कसे वाढेल, यावर मार्गदर्शन केले. ज्या महिला घर सांभाळून स्वतः शेतीत कष्ट करीत आहे. अशा महिलांचा गौरव केला.
यावेळी आशा गांगुर्डे यांनी गटशेतीमुळे काय फायदे झाले ते सांगितले. रुपाली पाटील यांनी शेतकरी गटामुळे महिलांमध्ये काय बदल झाले ते सांगितले. ललीता वाघ यांनी आजची महिला एकत्र आल्यावर विचारांच्या देवाणघेवाणीचा काय फायदा होतो, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच माया पाटील, रेखा पाटील, कविता पाटील यांनीही मार्गदर्शन केले. आबासाहेब पाटील यांनी महिलांनी उद्योजक बनण्यासाठी काही अडचणी व अर्थसहाय्य लागत असेल त्याचे आवाहन केले. जास्तीत जास्त महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून व्यवसाय सुरु करुन गटाच्या माध्यमातून मोठमोठे उद्योग उभे करा, असे सांगितले.
कंपनीतर्फे पाच महिलांना साड्या बक्षीस
शेवटी आलेल्या महिलांमधून लकी ड्रॉ पद्धतीने कंपनीतर्फे पाच महिलांना साड्या बक्षीस देण्यात आल्या. तसेच डॉ.कोमल देसले यांचा जामनेर येथील ओम साईन्युज यांच्यावतीने साडी देऊन गौरव करण्यात आला. यशस्वीतेसाठी कंपनीचे जामनेरचे एमडीआर विठ्ठल गोरे, पहुर विभागाचे एमडीआर महेंद्र पांढरे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अविनाश वाघ तर आभार दिवाकर पाटील, रवी सूर्यवंशी यांनी मानले.