साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील पिंपळे बुद्रुक गावात पायोनियर सीड्स कंपनीतर्फे महिला दिन अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा केला. गावातील महिलांसह मुलींना संरक्षण क्षेत्रातील करियर गाइडन्स, पोस्टातील गुंतवणूक योजना, कृषी क्षेत्रातील महिलांना उपलब्ध संधी, आरोग्य तपासणी शिबिर, मेडिकल फील्डमधील करिअर गाईडलाईन्स अशा वेगवेगळ्या विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. तसेच महिलांसाठी विविध खेळ, स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा, लिंबू चमचा स्पर्धा आणि हळदी कुंकूचा कार्यक्रमाचा समावेश होता.
गावातील शेतकऱ्यांना ‘मक्का पीक उच्च उत्पादन व व्यवस्थापन’ विषयावर प्रत्यक्ष मक्का मळणी करून मार्गदर्शन केले. कार्यक्रमात पारोळा येथील डॉ.मेघना सोनवणे आणि डॉ.विपुल सोनवणे यांनी आरोग्य तपासणी शिबिर घेतले. तसेच हरिश्चंद्र सौंदाणे (असिस्टंट) यांनी मुलींना ‘संरक्षण क्षेत्रातील करिअर संधी’वर मार्गदर्शन केले. तसेच गावातील हेड पोस्टमास्तर अनिता राजेंद्र पाटील यांनी पोस्टातील विविध गुंतवणूक योजनांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला पिंपळे बुद्रुकचे सरपंच दगूबाई पाटील, ग्रुप ग्रामपंचायत पिंपळे खुर्दचे सरपंच वर्षा पाटील, आशा वर्कर्स, पोलीस पाटील यांच्यासह महिला उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अमळनेर येथील कृषी दुकानदार लक्ष्मीनारायण ॲग्रो यांचे सहकार्य लाभले.
यावेळी पायोनियर कंपनीचे क्षेत्रीय अधिकारी मंदार निगडे, तालुका प्रतिनिधी नारायण पाटील, कल्पेश पाटील यांनी महिला दिनाचा विशेष सर्व उपक्रम राबवून संपूर्ण ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. जागतिक महिला दिवस आणि महाशिवरात्रीनिमित्त कार्यक्रम घडून आल्याबद्दल कंपनीचे सर्व महिलांनी आभार व्यक्त केले.