Cautious Of Online Scams : ऑनलाईन फसवणुकीपासून महिलांनी सावध राहावे

0
5

जि.प.च्या सीईओ मीनल करनवाल यांचे आवाहन

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

ऑनलाईन युगात महिलांवर वाढत्या फसवणूक प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर महिलांनी अधिक सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले. ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटांसाठी ऑनलाईन सतर्कता पंधरवड्याचा अभिनव उपक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आला आहे. त्याची सुरुवात जामनेर तालुक्यातील महिला बचत गटांच्या समुदाय संसाधन व्यक्तींशी ऑनलाईन संवाद साधून सोमवारी झाली.

जिल्ह्यात ‘उमेद’ अभियानांतर्गत तब्बल दोन हजार २५० समुदाय संसाधन व्यक्ती (सीआरपी) कार्यरत आहेत. ६७ प्रभाग संघ, एक हजार ४३० ग्राम संघ आणि ३३ हजार स्वयंसहायता समूहातून सुमारे ३ लाख ३० हजार महिला सक्रियपणे सहभागी आहेत. अशा सर्व महिलांना ऑनलाईन व्यवहार आणि डिजिटल व्यवहारांशी संबंधित सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन देण्यासाठी हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.

महिलांमध्ये ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. विविध प्रकारच्या मेसेज, लिंक आणि फसव्या कॉलद्वारे आर्थिक नुकसान होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे प्रत्येक महिलेने डिजिटल सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे. मोबाईल वापरताना कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या संदेशांना प्रतिसाद देऊ नये, पासवर्ड किंवा ओटीपी कोणासोबतही शेअर करू नये. तसेच बँकिंग व्यवहार करताना फक्त अधिकृत आणि सुरक्षित मार्गांचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

त्या पुढे म्हणाल्या की, कोणत्याही आकर्षक ऑफर किंवा अमिषाला बळी न पडता व्यवहारांची पडताळणी करूनच कृती करावी. आपल्या परिसरातील जाणकार किंवा विश्वासू व्यक्तीकडून खात्री करूनच डिजिटल व्यवहार पूर्ण करावेत. फसवणुकीची शक्यता असल्यास तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना कळवावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात २९ नोव्हेंबरपर्यंत उपक्रम राबविणार

ऑनलाईन कार्यशाळेस प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा राजू लोखंडे, लीड डिस्ट्रिक्ट बँक मॅनेजर सुनील कुमार दोहरे, जिल्हा अभियान व्यवस्थापक हरेश्वर भोई तसेच तालुका अभियान व्यवस्थापक आणि ‘उमेद’ टीम ऑनलाईन उपस्थित होती. संपूर्ण जिल्ह्यात हा सतर्कता पंधरवडा तालुकानिहाय राबविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम जामनेर, भडगाव, चोपडा, मुक्ताईनगर, धरणगाव, पारोळा, जळगाव, अमळनेर, एरंडोल, भुसावळ, रावेर, पाचोरा, चाळीसगाव आणि यावल येथे १० ते २९ नोव्हेंबर २०२५ दरम्यान पार पडणार आहे. या उपक्रमातून महिलांमध्ये डिजिटल जागरूकता वाढविणे, आर्थिक फसवणुकीपासून संरक्षण करणे आणि तंत्रज्ञानाचा सुरक्षित वापर प्रोत्साहन देणे असा उद्देश असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here