साईमत, जळगाव : प्रतिनिधी
अत्यंत कडक उन्हातील १४ वर्षीय मुलींचा अंतिम सामना बघत असताना पोद्दार व पाटील स्कूलच्या मुलींची जिद्द, सांघिक भावना व चिकाटी बघून अभिमान वाटतो. म्हणून महिलांनी आपल्या आयुष्यात खेळाला सुद्धा महत्त्व द्यावे, असे आवाहन जळगाव शहर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनी केले. त्या जळगावातील क्रीडा संकुल येथे जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनने आयोजित केलेल्या पारितोषिक वितरण समारंभात बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक अमर जैन होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे सचिव फारुक शेख, सहसचिव अब्दुल मोहसीन, संचालक ॲड. आमिर शेख, पोद्दारच्या क्रीडा संचालिका छाया बोरसे आदी उपस्थित होते.
पोद्दार स्कूलला दुहेरी मुकुट
मनपा जिल्हास्तरीय १४ वर्षातील फुटबॉल स्पर्धेत मुली व मुलांमध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, जळगावने विजय संपादन केला तर उपविजेतेपदी मुलांमध्ये सेंट जोसेफ तर मुलींमध्ये एल.एच.पाटील हा संघ राहिला. अमर जैन यांनी विजेते व उपविजेते संघाना चषक देऊन त्यांचा गौरव केला. स्पर्धेसाठी पंच म्हणून कौशल पवार, आकाश कांबळे, धनंजय धनगर, सुरज सपके, संजय कासदेकर, दिनेश सिंग, अरशद शेख, नीरज पाटील, वसीम शेख, सिद्धार्थ अडकमोल, लोकेश मांजरेकर यांनी काम पाहिले.
स्पर्धेचा अंतिम निकाल असा-
मुलांमध्ये उपांत्य फेरी सेंट जोसेफ वि.वि एल.एच.पाटील २-१ (पेनल्टी), पोद्दार वि.वि इकरा सालार ३-१(पेनल्टी), अंतिम सामना पोद्दार वि.वि सेंट जोसेफ २-०, मुलींमध्ये रोज लँड वि.वि सेंट जोसेफ २-०, गोदावरी वि.वि मिल्लत १-०, उपांत फेरी एल.एस.पाटील वि.वि रोज लँड, २-०(पेनल्टी), पोद्दार वि.वि गोदावरी, ५-०, अंतिम सामना पोद्दार वि.वि एल.एस.पाटील ६-०