खान्देश कन्या महिला विकास मंडळाने आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली
साईमत/ जळगाव/ प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील जरंडी गावातील ८० वर्षीय वृद्ध महिलेवर कथित लैंगिक अत्याचाराची गंभीर घटना घडल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. महिलांच्या सुरक्षिततेसंबंधी गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या या घटनेवर तातडीने कारवाई करण्याची मागणी जळगाव येथील महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
माहितीनुसार, घरात एकट्या असलेल्या वृद्ध महिलेवर आरोपी रमजान शेख याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे स्थानिक समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, महिलांच्या सन्मानासोबतच सुरक्षिततेवर चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अशा अमानवी आणि संतापजनक घटनेने सामाजिक संस्थांना आणि स्थानिक महिला संघटनांना खळबळले आहे.
या प्रकरणासंबंधी भारतीय जनता पार्टी, जळगाव जिल्हा तसेच खान्देश कन्या महिला विकास मंडळाने तीव्र निषेध नोंदविला आहे. निवेदनात आरोपीवर कठोर कारवाई करून त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी, तसेच हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. महिलांवरील अत्याचाराविरोधात स्पष्ट संदेश देण्यासाठी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, राज्य शासनाने प्रकरणातील पीडित महिलेच्या न्यायासाठी ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. तसेच अत्याचारग्रस्त वृद्ध महिलेला तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी विनंती निवेदनात समाविष्ट आहे.
हे निवेदन खान्देश कन्या महिला विकास मंडळाच्या अध्यक्षा मंगलाताई बारी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी सुनिता प्रदीप पाटील, वसुधा जोशी, शिला रंगरे, बायजाबाई माळी, पूजा जितेंद्र सोनवणे, विजया गांजरे, बासु कामत, पुनम सैनार, शारदा तायडे, शंकुतला मिस्त्री यांसह अनेक महिलांनी स्वाक्षऱ्या करून घटनेचा निषेध व्यक्त केला.
या घटनेने स्थानिक समाजात महिलांच्या सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण केली असून, प्रकरणावर त्वरित कारवाई करण्याची मागणी जोर पकडत आहे.
