अनेकांचे आधार लिंक नाही, धानोरा बँकेचे नियोजन ‘कोडमडले’
साईमत/धानोरा, ता.चोपडा /प्रतिनिधी :
‘मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना’ ही एक जुलैपासून सुरू केली आहे. त्याचे पैसे १७ ऑगस्टपासून महिलांच्या खात्यात पडण्यात सुरुवात झाली. मात्र रक्षाबंधनाची सुट्टी तसेच विविध सुट्ट्या मध्ये आल्याने गेल्या तीन ते चार दिवसांपासून धानोरासह परिसरातील महिलांची हजाराेच्या संख्येने बँकेत पैसे काढण्यासाठी गर्दी नजरेस पडत आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्या कारणामुळे बँकेचेही नियोजन ‘कोडमडले’ आहे.
महाराष्ट्र शासनाने मध्य प्रदेश शासनाप्रमाणे ‘मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना’ सुरू केली आहे. त्याचे अर्जही भरले गेले. काहींना अक्रोड असे मेसेज आले तर काहींचे रिजेक्ट असे मेसेज मोबाईलवर आले. त्यात १७ तारखेपासून पैसे टाकण्यास शासनाने सुरुवात केली. बँकेला सुट्टी आल्यामुळे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून धानोरा येथील सेंट्रल बँक पैसे काढण्यासाठी तसेच आधार लिंक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर महिलांची गर्दी पहायला मिळत आहे. धानोरा सेंट्रल बँकेत परिसरातील दहा खेडेगावांचा कार्यभार देण्यात आलेला आहे. त्यात देवगाव, पारगाव, बिडगाव, मोहरद, मितावली, पंचक, वरगव्हाण, शेवरेपाडा, शेवरे बु. आदी गावातील महिलांची खाती बँकेत आहेत.
आधारकार्ड बँकेला लिंक असणाऱ्यांनाच योजनेचा लाभ
सकाळी नऊ वाजेपासून महिला याठिकाणी नंबर लावत आहे. याठिकाणी आधार लिंकिंगसाठी वेगळी लाईन आहे. पैसे काढण्यासाठी आणखी एक वेगळी लाईन आहे. तसेच खात्यावरील बॅलन्स चेक करण्यासाठीही वेगळी लाईन आहे. अद्यापही काही महिलांचे पैसे पडलेले नाही. त्या महिलांचे पैसे का पडले नाहीत, अशीही विचारणा होत आहे. मात्र, ज्या महिलांचे आधारकार्ड बँकेला लिंक आहे. त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे ‘मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना’ चा लाभ घेण्यासाठी महिलांनी आधारकार्ड बँक खात्याला लिंक करणे आवश्यक आहे. ज्या महिलांचे आधार कार्ड लिंक असूनही लाभ मिळाला नाही. अशा महिलांनाही ३१ ऑगस्टपर्यंत ४५०० रुपयाचा लाभ सप्टेंबर महिन्यापर्यंत मिळू शकणार आहे.